भुसावळ : माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी २०१९ च्या रावेर विधानसभा निवडणुकी करिता नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती दिली. त्यांनी त्यांच्यावरील फौजदारी खटल्यांसंदर्भातही माहिती दिली नाही. त्यांनी अपूणर्ण वचुकीचे शपथपत्र दाखल केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दीपक पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार पत्राद्वारे केली आहे.
या पत्रानुसार माहिती अशी की अनिल चौधरी यांनी २०१९ रावेर विधानसभा निवडणुकी करीता नामनिर्देशन पत्र सादर करत असतांना नमुना २६ (नियम -४ अ) नुसार सादर केलेली माहिती देताना कलम ५ मध्ये फौजदारी खटल्या संबंधी माहिती देताना खरी माहिती न देता अपूर्ण माहिती व खोटे शपथपत्र दाखल केले. याबाबत शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी दीपक पाटील यांनी तक्रार केली आहे.
चौधरी यांच्या बदनामीसाठी षडयंत्र - ॲड. शर्मा भुसावळ : राजकीय षड्यंत्राला बळी पडावे, यासाठी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती त्यांचे वकील ॲड. राजेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली. चौधरी यांच्याविरोधात ममता सनांसे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौधरी यांनी त्यांना त्यांच्या मालकीचे पाच गाळे विक्रीचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप केला आहे. मात्र अनिल चौधरी यांच्या वतीने त्यांचे वकील शर्मा यांनी आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, चौधरी यांनी त्यांचे गाळे आयसीआयसी बँकेच्या ताब्यात दिले होते. तर, सनांसे यांच्याकडून घेतलेले पैसे हे उसनवारीसाठी घेतले होते. मात्र, त्यांनी कोऱ्या कागदावर अनिल चौधरी यांची स्वाक्षरी घेत बनावट खरेदीखत सादर केले असून यावर चौधरी यांनी पोलिसात तानाजी पाटील, सुधाकर सनांसे आणि ममता सनांसे यांच्याविरोधातफसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून अद्यापही यावर कारवाई होत नसल्याने चौधरी यांनीदेखील प्रतिदावा दाखल केला आहे.
हे आहेत तक्रारीतील मुद्देचौधरी यांचा रहिवास भुसावळचे येथे असून त्यांनी शपथपत्रात पत्ता स्टेशन रोड, मराठा मंगल कार्यालय जवळ मानकर प्लॉट रावेर असा दर्शविला. शपथपत्रात कलम पाच मध्ये सादर केलेली माहितीही अपूर्ण असून त्यात केवळ एकूण नऊ केसेस असल्याची माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहे मात्र त्यांनी ती माहिती लपवलेली आहे.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यात त्यांना ११/९/२०१२ रोजी शिक्षा झाली होती. याचबरोबर इतर पाच गुन्हे जे दाखल असताना दर्शविले नाही. याची यादी तक्रार पत्रात दिली आहे. भुसावळला एका महिलेची गाळे प्रकरणी सुद्धा फसवणूक केली असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.