लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंपळकोठा प्र.चा. ता. एरंडोल येथील स्वस्त धान्य दुकानदार इस्माईल मुसा पटेल यांच्याविरोधात गावातील कार्ड धारक अकिल उस्मान पटेल यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर एरंडोलच्या तहसीलदारांनी त्याबाबत चौकशी करून हे दुकान निलंबित किंवा रद्द करण्यात यावे, असे स्पष्ट मत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नोंदविले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागातर्फे या दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पिंपळकोठा प्र.चा. ता.एरंडोल येथील स्वस्त धान्य दुकानदार इस्माईल मुसा पटेल यांच्याविरोधात अकिल उस्मान पटेल यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर त्याबाबत तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने त्याची चौकशीदेखील केली. त्यानंतर तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा विभागाला पत्र देऊन दुकानदारावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराने गावातील काही जणांचे रेशन कार्ड आपल्याकडे ठेऊन घेतले आहे. तसेच हे रेशनकार्ड त्यांना परत देण्यासदेखील त्याने नकार दिला. त्यातील एक अकील पटेल यांची बहीण आजारी असताना उपचारासाठी कागदपत्राची आवश्यकता होती. मात्र तरीही दुकानदाराने रेशन कार्ड पटेल यांना दिले नाही. त्यानंतर पटेल यांनी पुरवठा कार्यालयात येऊन दुकानदार इस्माईल पटेल यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी शिधापत्रिका देण्यास नकार दिला. पुरवठा निरीक्षकांनी केलेल्या तपासात २७ लाभार्थ्यांनी जबाब दिला आहे. त्यातील आठ लाभार्थी यांनी अजिबात तक्रार नसल्याचे सांगितले, तर सात लाभार्थ्यांनी या दुकानदाराच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. त्यानुसार एरंडोल तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा विभागाला अहवालदेखील दिला आहे.
तहसीलदारांनी दिलेल्या अहवालावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी अकिल उस्मान पटेल, असलम इस्माईल पटेल, इस्माईल भिकन पटेल, कुर्बान पटेल यांनी केली आहे.
कोट - पिंपळकोठा, ता. एरंडोल येथील स्वस्त धान्य दुकानदाराबाबत तक्रारी आलेल्या आहेत. त्याबाबत एरंडोल तहसील कार्यालयाला अहवालदेखील प्राप्त झाला आहे. त्यानुसार लवकरच त्यावर कारवाई केली जाईल.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी