जळगाव : पतसंस्थेकडून कुठलेही कर्ज न घेता परस्पर उताऱ्यावर बोजा बसवून शेळगाव, ता.जळगाव शिवारातील १ हेक्टर ७२ आर इतकी शेतजमिन बहिणाबाई चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेने परस्पर विक्री केल्याची तक्रार एकनाथ खेमचंद पाटील (४५, मुळ रा.शेळगाव, ह.मु.पुणे) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. संस्थेचे चेअरमन विलास यशवंत चौधरी यांच्यासह २३ जणांविरुध्द त्यांनी तक्रार दिली आहे.
शेळगाव शिवारात गट क्र.२०४ मध्ये पाटील यांची शेती आहे. आपण पुण्याला वास्तव्याला असताना २४ ऑगस्ट २०२० रोजी सहकार विभागाने शेती विक्रीची ऑर्डर काढली व प्रत्यक्षात २४ डिसेंबर २०२० रोजी शेती वसंत चौधरी (रा.आसोदा) यांच्या नावावर झाली. या शेतजमीनीवर बोजा बसविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात आपण कोणतेच कर्ज घेतले नाही किंवा कोणाला जामीनही झालेलो नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. सहकार विभागाकडील कागदपत्रे, उतारे, खरेदीखत व माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असून तोतयेगिरी केल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली, येथून न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.