जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे तत्कालीन ग्रामसेवकाने सरपंचांना अंधारात ठेवून १४ व्या वित्त आयोगाचा ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी यात ४० ते ४२ लाख रुपयांचा अपहार केला आहे, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी मान्य नसल्याचे सांगत वरिष्ठ पातळीवरून याची सविस्तर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जि. प. सदस्य अमित देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
संबंधित विस्तार अधिकारी बैरागी यांच्याऐवजी त्रयस्त चौकशी अधिकारी नेमावे, कामे प्रत्यक्ष जागेवर न दाखविता केवळ कागदोपत्री दाखवून बँक खात्यातून मोठ्या रकमा काढण्यात आला आहेत. यासह खोटे मूल्यांकन दाखवून व मोजमाप पुस्तिका नोंदविणाऱ्या शाखा अभियंता व ग्रामसेवक यांनी संगनमताने अपहार केला असून, याप्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक, शाखा अभयंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच संदीप साळवे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलेकर, वजीर तडवी व दिलीप रदाळ आदी उपस्थित होते.