लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी कोविड रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याच्या तीन तक्रारी आल्या आहेत. पहिल्या लाटेतही अशा असंख्या तक्रारी समोर आल्या होत्या. यातील काही तक्रारी थेट प्रशासकीय पातळीवर गेल्या आहे. या तक्रारी सोडविताना रुग्णांना परतावा करण्यासह थेट कोविडची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येते, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
खासगी रुग्णांलयाना काही निकष घालून कोविड उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे निकष पाळले जात आहेत किंवा नाही, शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कानुसारच रुग्णांकडून शुल्क आकारले जात आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी ५० लेखाधिकारी व आक्षेप निवारण समिती कार्यरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक या समितीचे प्रमुख आहेत. यासह भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेत प्रशासनाकडे तीन रुग्णालयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील एका रुग्णालयाला रुग्णाला पैसे परत करावे लागले असून अन्य एका रुग्णालयाची चौकशी सुरू आहे. तर एका रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
लेखाधिकाऱ्यांची व्हिजिट
खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी ५० लेखापरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे लेखापरिक्षक डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची बिले तपासून ती शासकीय निकषानुसार घेतली गेली आहे की नाही, ते तपासले जाते. यासह प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले लेखाधिकारी कैलास सोनार हे जिल्हाभर या रुग्णालयांमध्ये पाहणी करून तपासणी करीत असतात, नुकतेच प्रशासनातर्फे सर्व लेखाधिकारी यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर केले होते.
अशी होते कारवाई
रुग्णालयाबाबत प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर आक्षेप निवारण समिती ही डॉक्टर, रुग्ण तसेच लेखाधिकारी यांचे तिघांचे म्हणणे घेऊन यात निर्णय घेत असते, यात रुग्णाला पैसे परत मिळण्यापासून ते रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जात असते.
...तर मान्यता रद्द
कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कानुसार शुल्क न आकारल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नुकताच दिला होता. बिलांबाबत रुग्णांना अडचणी असल्यास ०२५७/२२२६६११ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.