जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली असली तरीही अमळनेर, धरणगावसह काही तालुक्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. धरणगाव व अमळनेर तालुक्यात मात्र जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतच पेरण्या झाल्या असल्याचे समजते.जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे त्याचा परिणाम पेरण्यांवर व पिकांच्या लागवड क्षेत्रावरही झाला आहे. पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरीही पावसाने हा उशिर भरून काढला आहे. त्यामुळेच मागील वर्षी आजच्या तारखेला २२.३ टक्के पाऊस झालेला असताना यंदा १९.३ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरीही धरणगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा, चाळीसगाव आदी तालुक्यांमध्ये अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील पेरण्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धरणगाव व अमळनेर तालुक्यातील पेरण्यांवर कमी पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला असून या तालुक्यांमध्ये जेमतेम ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. बोदवड, यावल, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर आदी तालुक्यांमध्ये पेरण्या पूर्णत्वाकडे आहेत. तर धरणगाव, अमळनेर तालुक्यात जेमतेम ५० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.बोदवड तालुक्याची आघाडीबोदवड तालुक्यात कपाशीची १०६ टक्के पेरणी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण सरासरी ८० टक्क्यांच्या आसपास कपाशीची पेरणी आटोपली आहे. तर ज्वारीच्या पेरणीतही घट झाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जेमतेम ३० टक्क्यांच्या आतच झाली आहे. तर अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये कडधान्याच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात खरीपाची ८० टक्के पेरणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:44 AM