नशिराबाद : लघु पाटबंधारे अंतर्गत येथून जवळच असलेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकणाऱ्या मुर्दापूर धरणाची रखडलेली उंची वाढ तत्काळ मार्गी लागावी, अशा मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी दिले. उंची वाढ बाबत पाठपुरावा करून मार्ग काढण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
निवेदनावर माजी सरपंच पंकज महाजन,विकास पाटील सै.बरकत अली, प्रकाश महाजन, सय्यद नवाब अली, संतोष चौधरी, चंद्रकांत नारखेडे, चंद्रकांत पाटील, राजू सुरमारे, डिगंबर रोटे, विजय पाटील, किरण चौधरी, देवेंद्र माळी, सचिन भोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.
मुर्दापूर धरणाची उंची वाढ प्रस्तावाचे ९५ टक्के काम झाले असल्याने सांडव्याची व जमिनीचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देऊन लघु पाटबंधारे तलाव नशिराबादचे रखडलेले काम पूर्णत्वास यावे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. मुर्दापूर धरण प्रकल्पास १९८८ मध्ये मान्यता मिळाली. १९९६-९७ मध्ये काम पूर्णत्वास आले. तलावाची क्षमता ३.१२३ टीएमसी पाणी साठवण इतकी असून साधारणत: ५६५ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यास मदत झाली. मात्र उंची वाढीच्या प्रस्तावास मूळ प्रशासकीय मान्यता १९९९ मध्ये मिळाली असून सदर उंची वाढण्याच्या कामात केवळ सांडव्याचे काम वगळता सर्व काम २०१६-१७ मध्ये सुरू होऊन २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सांडव्याचे काम पूर्ण झाल्यावर उंची वाढीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ६.७४ टीएमसी होणार आहे. ९४२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देण्यास शेतकरी तयार असून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. प्रकल्पासाठी लागणारा जमिनीचा मोबदला हा प्रकल्पात झालेल्या विलंबामुळे जास्त होत असल्याने उंची वाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची शिफारस या पूर्वीच्या कार्यकारी संचालकांनी शासनाकडे केली असल्याने नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारे काम होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत तत्काळ पाठपुरावा करून उंची वाढ प्रकल्प पूर्णत्वास न्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्प तत्काळ गती देऊन काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणीही निवेदनात केली आहे.