ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 04- जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे 53 टक्के काम झाले असून हे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. प्रत्येक नागरिकाला संगणकीकृत सातबारा मिळावा यासाठी शासनाने सातबारा संगणकीकरणाच्या कामाला अधिक महत्त्व दिले आहे. जिल्हा पातळीवर सातबारा संगणकीकरणाचे काम हे अचूक पध्दतीने होण्यासाठी चावडीवाचनही करण्यात आले. सर्वर डाऊनच्या अडचणीमुळे जळगाव जिल्ह्याचे सातबारा संगणकीकरणाचे काम अद्यापही फारसे प्रगतीपथावर नाही. यासंदर्भात तहसीलदारांना नोटीस देऊन त्यांची वेतनवाढ रोखण्याचीही कारवाई करण्यात आली आहे. सातबारा संगणकीकरणाबाबत अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सातबारा संगणकीकरणाच्या कामाविषयी त्यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. बैठकीनंतर माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, सातबारा संगणकीकरण हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जिल्ह्यात आतार्पयत 53 टक्के काम पूर्ण झाले आहेत. यात भडगाव तालुका आघाडीवर असून या तालुक्यात 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. बोदवड 77 टक्के, जळगाव 63 टक्के, अमळनेर 50 टक्के, जामनेर 50, यावल 62, एरंडोल 58, मुक्ताईनगर 58, चाळीसगाव 43, भुसावळ 50, चोपडा 57, रावेर 55, पारोळा 32, धरणगाव 46 आणि पाचोरा 53 टक्के काम झाले असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर यांनी सांगितले. आता दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.