जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून उत्कंठा असलेल्या नार-पार योजनेबाबत शेतकऱ्यांनाही मोठ्या अपेक्षा असून या योजनेला गती देण्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवड होऊनही त्याबाबतचे आदेश मात्र त्यांना मिळालेले नव्हते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आदेश प्राप्त झाल्यानंतर चिमणराव पाटील यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नदी जोड प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व्ही.डी. पाटील, अधीक्षक अभियंता ए.एस. मोरे, ‘कडा’ जळगावचे प्रशासक एस.जे. वंजारी, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, वाघूर धरण विभाग कार्यकारी अभियंता पी.पी. वराडे, तापी खोरे सर्वेक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता जी.एस. महाजन, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी. बेहरे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या जिव्हाळ््याचा प्रश्नपाणी हा शेतकºयांचा जिव्हाळ््याचा प्रश्न असून पाण्याशी संबंधित महामंडळाचे उपाध्यक्षपद आपल्याला मिळाले असल्याने या क्षेत्रात मोठे काम करायचे असल्याचे चिमणराव पाटील यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित या पदाला पूर्ण न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जलसंपदा मंत्री जिल्ह्याचेच असल्याने प्रकल्पांसाठी निधी मिळण्यासही अडचण येणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.जिल्ह्यात कोणत्या प्रकल्पाचे काम करावे, या विषयी शेतकरी जे सूचवतील ते प्रकल्प पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले.‘पद्मालय’साठी नाबार्डमधून निधी घेणारअपूर्ण प्रकल्पांचा आपण आढावा घेणार असून ज्या प्रकल्पांवर अन्याय झाला आहे, तो दूर केला जाईल. यात पद्मालय प्रकल्पास निधी नसल्याने मोठा अन्याय झाला आहे. तोदेखील दूर केला जाईल, प्रसंगी त्यासाठी नाबार्डकडून निधी घेऊ,असे ही पाटील यांनी सांगितले.आतापर्यंतचे उपाध्यक्षराजाराम गणू महाजन (रावेर), प्रशांत हिरे (दाभाडी, नाशिक), रामदास किसन चारोस्कर (दिंडोरी, नाशिक), दौलतराव आहेर, चिमणराव रुपचंद पाटील (पारोळा, जळगाव).सम न्याय देण्याची भूमिका ठेवत प्रकल्प पूर्ण करणारजिल्ह्यातील पद्मालय असो की पाडळसरे की अन्य कोणतेही प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून या सर्व प्रकल्पांबाबत सम न्यायाची भूमिका ठेवत सर्वच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कोणताही प्रकल्प असला तरी त्यांचे काम व्हावे यासाठी तापी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:08 PM