अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात
यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार
यावल : शहरास सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या साठवण तलावालगतच अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. दोन्ही साठवण तलावांत सुमारे पाच महिने पुरेल एवढा साठा राहणार असल्याने शहराचा सुमारे ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साठवण तलावावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
सुमारे २२ वर्षांपूर्वी येथील जुन्या भालशिव रस्त्यावर हतनूर कालव्यालगत शहरास सुमारे तीन महिने पुरेल एवढ्या साठ्याचा तलाव करण्यात आला होता. मात्र, कालांतराने तलावास लागलेली गळती आणि गाळाचे प्रमाण वाढल्याने हा साठा निम्म्यावरच आला. एखाद्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने हतनूरमधील पाणीपातळी खालावते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्तन सुटण्यास विलंब होतो. पर्यायाने शहरवासीयांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता पालिकेने याच तलावालगत दोन कोटी ८७ लाख रुपये किमतीच्या १०० एमएललडी क्षमतेचा पाणीसाठा होणारा अतिरिक्त तलाव तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. पूर्वीचा ३०० एलडी आणि हा १०० एमएलडी, असा ४०० एमएलडी साठा आता शहरास उपलब्ध राहणार असून, हा साठा शहरास सुमारे पाच महिने पुरणार आहे व भविष्यात लोकसंख्या वाढली तरी तीस वर्षे शहराची पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी
सांगितले.
२०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ११ मीटरची खोली असलेल्या या तलावाचे काम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण तलावावर ३००
मायक्रॉन जाडीची एचडीपीई ताडपत्री अंथरण्यात आली आहे. यामुळे तलावातील पाण्याचा जमिनीच्या पृष्ठभागाशी संपर्क येणार नसल्याने पाण्याची गळतीच
होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पूर्वी शहरास एकमेव साठवण तलाव
असल्याने तलावातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीचे, तसेच साचलेला गाळ
काढण्याचे काम पालिका करू शकत नव्हती. आता मात्र जुन्या तलावाची दुरुस्ती
करता येईल व भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तलावाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ इनलेट व आउटलेटचे
पाइपलाइनचे काम बाकी आहे. ते आगामी आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राकेश कोलते, समीर शेख, गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजू फालक, धीरज महाजन, एजाज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.