लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन-कोविड सुविधा सुरू झाल्यानंतर आता हळूहळू सामान्यांना दिलासा देणारी सेवा उपलब्ध होत आहे. नॉन-कोविड सुविधा सुरू झाल्यानंतर प्रथमच कर्करोगाची एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी एका पुरुष रुग्णाला धोक्यातून बाहेर काढले आहे. ही शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली.
नसिराबाद येथील एका ४० वर्षीय पुरुषाच्या लिंगाला जखम झालेली होती. मात्र, ती वाढतच गेल्याने त्याला जीएसीच्या सर्जरी विभागात दाखल झाले होते. सर्व तपासण्या केल्यानंतर या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर रुग्णाची परिस्थिती पाहून सर्जरी विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. पोटे, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, परिचारिका नीला जोशी आणि त्यांचे पथक यांनी यात सहकार्य केले.
दुर्मीळ शस्त्रक्रिया
या पुरुषाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्याचे लिंग काढून मूत्रमार्ग बदलिवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला खासगी रुग्णालयात ५० हजारांपेक्षा अधिक खर्च येत असतो. मात्र, जीएमसीत ही शस्त्रक्रिया शासकीय शुल्क आकारून करण्यात आली.