जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. मंगळवारी जिल्हा न्यायालयात दोन्ही नेत्यांनी याप्रकरणी तडजोड करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या गैरसमजूतीतून हा प्रकार झाला होता, असे न्यायालयाने दोन्ही नेत्यांकडून लेखी घेत हा खटला मागे घेण्यात आला आहे. खडसेंनी हा दावा मागे घेतल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सन २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे युतीच्या काळात मंत्री असताना, गुलाबराव पाटील यांनी एका सभेत एकनाथ खडसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले होते. या आरोपानंतर खडसे यांनी गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या लग्नाच्या दिवशी जिल्हा न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या याचिकेवर अनेक वर्षांपासून कामकाज सुरू होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोन वेळा, तर एकनाथ खडसे एक वेळा हजर न राहिल्यामुळे दोन्ही नेत्यांना न्यायालयाने ५०० रुपयांचा दंडही केला होता.
दोन्ही नेत्यांनी पुढाकार घेत, केली तडजोड...खडसेंनी दाखल केलेल्या खटल्याबाबत मंगळवारी न्यायालयात कामकाज होणार होते. त्यामुळे न्यायालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे हे दोघेही हजर होते. न्यायालयात अब्रुनुकसानीच्या दाव्यासंदर्भात मंगळवारी सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने ॲड. एस. आर. बागुल, ॲड. शैलेंद्र पाटील यांनी काम पाहिले, तर एकनाथ खडसे यांच्या बाजूने ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.
अनेक दिवसांपासून हा खटला सुरू होता. मंगळवारी या प्रकरणी कामकाज होणार होते. त्याचवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा खटला मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यामुळेच त्यांच्या विनंतीनुसार आपण हा खटला मागे घेतला आहे. भविष्यात कोणत्याही नेत्यावर आरोप करताना पुराव्यानिशी आरोप केले गेले पाहिजेत.- एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
आम्हा दोघांच्या समजुतीने हा खटला मागे घेण्यात आला आहे. गैरसमजातून हा वाद झाला होता. याबाबतचे लेखी आम्ही न्यायालयात सादर केले.-गुलाबराव पाटील, पालकमंत्री