जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी शासकीय संगणकीय टायपिंग परीक्षा मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारपासून सुरू होत असलेली ही परीक्षा ३१ मार्चपर्यंत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.संगणकीय टायपिंग परीक्षेसाठी काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांची पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मंगळवारपासून सुरू होत असलेली टायपिंग परीक्षा ही जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर होईल. त्यामध्ये जळगाव शहरातील मू़जे़ महाविद्यालय, चोपड्यातील एस़एस़पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एरंडोल येथील माध्यमिक विद्यालय एरंडोल तसेच अमळनेरमधील साई पॉलिटेक्नीक, लोकमान्य विद्या मंदिर त्याचबरोबर चाळीसगावातील स्व. जुलालसिंग पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पारोळ्यातील व्ही.एम.जैन माध्यमिक विद्यालय, पाचो-यातील एस.एस.एम.एम कॉलेज पाचोरा व भुसावळ येथल पी.ओ.नाहाटा या केंद्रांचा समावेश आहे.संगणकीय टायपिंग परीक्षेला जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६५६ विद्यार्थी बसणार आहेत. दिवसभरात पाच सत्रामध्ये ही परीक्षा होईल.सकाळी ९ ते १०.३०, सकाळी ११ ते दुपारी १२.३० तसेच दुपारी १ ते २.३०, दुपारी ३ ते ४.३० व सायंकाळी ५ ते सायंकाळी ६.३० या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे.