लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रभंजन ऑटोमोबाइलकडून खरेदी करण्यात आलेल्या १२० कॉन्सन्ट्रेटरचेही स्पेसिफिकेशन तपासले जाणार आहे. याबाबत पुन्हा प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर आणि बालरोगतज्ञ डॉ. वृषाली सरोदे या दोन सदस्यांची समिती ही तपासणी करणार आहे. त्यांना मंगळवारी याबाबत पत्र देण्यात येणार असून एक किंवा दोन दिवसात याची तपासणी होऊन अहवाल सादर केला जाऊ शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
प्रभंजन ऑटोमोबाइलकडून तब्बल दुपटीपेक्षा अधिक दराने कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले आहे. नोंदणीकृत मॉडेल दुसरेच व देण्यात आलेले आहे दुसरेच, अशी तक्रार करीत याबाबत कारवाईची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने पुरवठादार प्रभंजन ऑटोमोबाइलने याबाबत खुलासा द्यावा, असे पत्र जिल्हा प्रशासनाने १३ ऑगस्ट रोजी दिले. त्यांनी याबाबतचा खुलासा सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला आहे. त्यात मागितलेलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा आमचे स्पेसिफिकेशन अद्ययावत असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
अन्य जिल्ह्यातील दर तपासणार
अन्य जिल्ह्यांमध्ये कॉन्सन्ट्रेटर कोणत्या किमतीत खरेदी करण्यात आले आहेत. त्याची माहिती घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या असून त्यानुसार आता ही माहिती घेणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
तक्रारदारांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
माहिती अधिकार कार्यकर्ते तक्रारदार दिनेश भोळे यांनी सोमवारी शिवराम पाटील यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्याला व्हेंटिलेटर प्रकरणाचा अहवाल मिळावा, कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात निविदा रद्द करण्यात याव्यात, शिवाय पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय व्हेंटिलेटर पुरवठादाराच्या ताब्यात देऊ नये, असे काही मुद्दे त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच अहवाल सादर होऊनही पुरवठादार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर का कारवाई होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर एकत्रित अहवाल राज्य आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
कार्यालय आवारात उघडले कॉन्सन्ट्रेटर
पुरवठादार एजन्सीकडून प्रभंजन ऑटोमोबाइलकडून जिल्हाधिकारी कार्यालयात कॉन्सन्ट्रेटर तपासणीसाठी आणलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यावेळी उपस्थित होते. बाहेर आवारातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना हे कॉन्सन्ट्रेटर बाहेर काढून दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या एका व्यक्तीने ते खांद्यावर उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. मात्र, याठिकाणी बैठक सुरू होती. त्यामुळे तपासणी झाली नसल्याची माहिती आहे.