जळगाव : तालुक्यातील असोदा, ममुराबाद येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबियांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, तसेच घरे योजने अंतर्गंत घरकुले द्यावीत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासना नंतर उपोषण मागे घेतले आहे.
महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लाल बावटा) तर्फे विनोद अढाळके, अकिल खान, वंदना सपकाळे, रंजना कोळी, ताराबाई कोळी, अनिल सपकाळे, उषाबाई कोळी,रेखाबाई भील आदींनी बुधवार पासून आपल्या मागण्यांबाबत दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. आपल्या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर, जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांसाठी घरे या धोरणा अंतर्गंत ग्रामपंचायतीकडून नियोजित ३ ऑगस्ट २०२१ च्या ग्रामसभेद्वारे ठराव व प्रस्ताव घेऊन उपविभागीय अधिकारी,जळगाव यांनी शासन निर्णयानुसार समितीची मान्यता घेणेबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याने, उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.