लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य विभागातील जागांसाठी सरळसेवा भरती घेण्यात आली होती. तिचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. मात्र, हा निकाल ऑनलाइन जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
आरोग्य खात्यातील जागांसाठी घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल मागील महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरळ फोनद्वारे संपर्क साधून कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहे. दुसरीकडे निकाल ऑनलाइन प्रसिद्ध न केल्यामुळे मेरिट लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना पाहण्यास मिळालेली नाही. ऑनलाइन निकाल न लावता फोन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आपली निवड झाली आहे की नाही, हा सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याची मागणी होत आहे.