लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ब्रेक द चेनमध्ये शनिवार, रविवार देखील किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळ विक्री सुरू राहणार आहे. याबाबत व्यापाऱ्यांनीही खात्री करून घेतली असून शनिवारी नेहमीप्रमाणे ही दुकाने सुरु राहणार आहे. दरम्यान, शनिवार रविवार बंद राहण्याच्या भीतीने शुक्रवारी संध्याकाळी भाजीबाजारात चांगलीच गर्दी उसळली होती.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपाययोजना म्हणून ५ एप्रिल पासून ब्रेक द चेन लागू करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे शनिवार, रविवार या सेवादेखील बंद राहतील असे सर्वांना वाटत होते. मात्र यामध्ये नंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने बदल करून शनिवार-रविवार किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्री, मिठाई दुकान, दूध विक्री या सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीदेखील शनिवारी दुकाने उघडावी की नाही या विचारात व्यापारी होते. त्यानुसार त्यांनी खात्री करून घेत शनिवारी दुकाने उघडता येतील, असे सांगण्यात आल्याने आता शनिवार व रविवार देखील अत्यावश्यक सेवेतील ही दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र आदेशातील इतर सूचनांप्रमाणे सर्व नियमावली लागू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाजीपाला खरेदीला गर्दी
शनिवार, रविवार बाजारपेठ पूर्णपणे बंद राहते की काय या विचाराने नागरिकांनी शुक्रवारी संध्याकाळी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये बळीराम पेठ, घाणेकर चौक, प्रभात चौक, गिरणा टाकी याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे शिवतीर्थ मैदानाजवळ भाजीपाला विक्रीसाठी विक्रेते बसले असतानाही त्या ठिकाणी फारसी गर्दी नव्हती.
शनिवार रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवावी की नाही याबाबत व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम होता. मात्र याविषयी जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश काढले, त्याची खात्री करून घेतली. शनिवार-रविवार या सेवा सुरू राहणार असल्याचे जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.
या सेवा राहणार सुरू
- किराणा दुकान, भाजीपाला विक्री, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने
- रुग्णालय, रोगनिदान केंद्र, औषध विक्री,
रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, बस सेवा
- मान्सूनपूर्व कामे, कृषी संबंधित सेवा
- मालवाहतूक, सार्वजनिक सेवा
- पेट्रोल पंप, गॅरेज, कार्गो सेवा
- बँकिंग व्यवहार, वीज वितरण, विमा कंपन्या, वित्तीय संस्था
या सेवा राहणार बंद
- रेस्टॉरंट, हॉटेल, बार (या ठिकाणाहून केवळ होम डिलिव्हरी सेवा)
- खाजगी बसेस, वाहने (कामगारांसाठीची वाहने सुरू राहणार)
- मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृह, मैदाने
- सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे
- स्पा, सलुन, ब्युटी पार्लर
- सर्व धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवार-रविवार किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्री, दूध विक्री अशा अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी अगोदरच्या आदेशात सुधारणादेखील करण्यात आली आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी