लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याने बाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या दोन -तीन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण सोमवारी सकाळपासून सुरू झाले. यासाठी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर गर्दी झाली होती. अमळनेरात तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही ठरावीक प्रमाणात लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. लस घेणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे तर दुसरीकडे उपलब्ध लसींचे प्रमाण अत्यंत तोकडे असे चित्र होते. जिल्ह्यात शनिवार, २४ एप्रिलपर्यंत २,६३०६२ एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पारोळ्यात लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा
पारोळा : कुटीर रुग्णालयात नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून रांगा लावल्या होत्या. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मनुष्यबळ अपूर्ण पडत असल्याने लस देण्यास वेळ लागत होता. जर रजिस्ट्रेशनसाठी दोन जणांना स्वतंत्र संगणक दिले तर रजिस्ट्रेशन लवकर होईल व लसीकरणाचा वेग ही वाढण्यास मदत होईल. म्हणून मनुष्यबळ यासाठी वाढविण्यात यावे, लसीकरणासाठी आलेले काही जण या ठिकाणी हुज्जत घालतात म्हणून लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमावा, अशीही मागणी करण्यात आली. पारोळा येथे सोमवारी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते.
बाजारातील गर्दी ओसरली मात्र लसीकरणाला गर्दी
अमळनेर : गेल्या आठ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने आज बाजारात गर्दी कमी होती. मात्र, लस घेणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. सुमारे ११७० लस एकाच दिवसात संपल्याने लसीकरणात पुन्हा खंड पडणार आहे.आदल्या रात्री रुग्णालयात लस उपलब्ध झाल्याचा संदेश प्राप्त होताच सकाळी सहा वाजल्यापासून पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय, झामी चौक, पालिकेचे रुग्णालय, मारवड, मांडळ, जानवे, पातोंडा आणि ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकच गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालयात २५० लस, पालिकेच्या रुग्णालयात २२० लस तसेच ग्रामीण भागात पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १४० लस उपलब्ध झाल्या होत्या. रांगेने अँटिजेन चाचण्या करून लस नागरिकांना देण्यात आल्यात.
एरंडोल येथे लसी कमी पडल्याने पोलिसांना पाचारण
एरंडोल : सोमवारी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. लस अपूर्ण पडल्याने काही वेळ गोंधळ उडाला. यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहीफळे,संदीप सातपुते हे वेळीच रूग्णालयात हजर झाले. त्यांनी नागरीकांची समजूत घातली. परंतू तरीसुध्दा नागरीकांची नाराजी दूर झाली नाही.या रूग्णालयाला शंभर लसींचा डोस प्राप्त झाला, उपस्थित नागरीकांचा रोश लक्षात घेऊन आणखी शंभर लस जळगाव येथून तातडीने मागविण्यात आल्या अश्या प्रकारे सकाळी ९वाजेपासुन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २०० नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ज्यांना लस मिळाली नाही, त्यांनी नाराजी व संताप व्यक्त करीत घराकडे परतावे लागले.
जामनेर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने भयभीत झालेले नागरिक लस घेण्यासाठी उत्सुक असले तरी त्यांना लसीच्या अपूर्ण पुरवठ्यामुळे माघारी परतावे लागत आहे. तालुक्यासाठी सोमवारी १ हजार २०० लसी मिळाल्या मात्र मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने सर्वत्र गोंधळ उडाला.n पहूर ग्रामीण रुग्णालय, जामनेर उपजिल्हा रुग्णालयासह सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यांना जोडलेल्या उपकेंद्रासाठी मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने नियोजन करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.