२५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने मीटिंग घेऊन ठराव केला की, २०१५ची वॉर्डरचना जी होती ती तशीच असावी, त्यामध्ये कुठलाही बदल करू नये, असा ठराव ग्रामपंचायतीने केलेला होता. तरीदेखील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला दिसून येत आहे. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी सोनवणे हे ग्रामपंचायतीमध्ये आलेले होते, त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या व वाॅर्डची रचना ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने राहील असे सांगितले. येथे एकूण पाच वॉर्ड असून, काही लोकांची नावे आलेल्या मतदार यादीतून गायब आहेत, तर काहींची नावे दुसऱ्याच वाॅर्डात आहेत. एकाच कुटुंबातील काही लोकांची नावे वाॅर्ड दोनमध्ये तर काही लोकांची नावे वाॅर्ड तीनमध्ये अशी विभागणी केलेली आहेत. गावातील शेकडो नागरिकांनी मतदार यादी बघण्यासाठी गर्दी केली होती तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. नागरिकांनी गावातील तलाठ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे की, जो ज्या वाॅर्डात आहे त्या वाॅर्डात घेऊनच वाॅर्डांची पुनर्रचना करावी. मात्र याबाबत तलाठी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकसुद्धा उपस्थित नसतात. त्याचा या ग्रामपंचायतीत मनमानी व भोंगळ कारभार सुरू आहे. लवकरच निवडणूक होऊन एक सुनियोजित प्रशासन बघायला मिळेल, अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत. जेणेकरून गावाचा विकास होईल, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. वाॅर्डांची पुनर्रचना करण्यात आली नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी ग्रामपंचायतींमध्ये अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये रवींद्र महाजन, गणेश पाटील, मनोहर महाजन, धोंडू पाटील, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, रूपेश महाजन, नितीन जैतकर, सुनील खैरे, सतीश पाटील, शुभम पाटील, संदेश महाजन, यश महाजन आदी उपस्थित होते.