लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : निविदा प्रक्रियेतील घोळ व प्रशासनाच्या चालढकलपणामुळे आरोग्य केंद्राचे पाच कोटी रुपये अत्यावश्यक असतानाही खर्च न होता ते परत गेल्याचा मुद्दा मांडत विरोधी सदस्यांनी जि. प. स्थायी समितीच्या सभेत संताप व्यक्त केला. यासह जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवरील व्यापारी संकुलाचा विषयही या सभेत गाजला.
स्थायी समितीची सभा सोमवारी ऑनलाईन पार पडली. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सभेत आरोग्य केंद्राच्या विषयासह दफ्तर न देणाऱ्या वरसाडे ग्रामसेवकावर कारवाई करा, अशी मागणी सदस्य मधू काटे यांनी केली. यासह आरोग्य विभागातील कालबद्ध पदोन्नत्यांचा विषय मांडण्यात आल्यानंतर येत्या आठ दिवसात ही प्रक्रिया होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सदस्यांचा संताप
२०१९-२० मध्ये कासोदा, धारागिर, लोहारा, नगरदेवळा, रिंगणगाव या आरोग्य केंद्र व उपकेंद्राना पालकमंत्री व आमदारांच्या पाठपुराव्यानंतर पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.हा निधी खर्च करण्यासाठी २०२१ च्या मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, ज्या निविदा आल्या त्या अपात्र करण्यात आल्या नंतर पात्र केल्या. निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना २० टक्के भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या. या प्रकाराने ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली, या सर्व प्रकारात व प्रशासनाच्या चालढलपणामुळे अखेर हा निधी परत गेल्याचा आरोप शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन तसेच मधू काटे यांनी केला. आता पालकमंत्री व आमदारांकडेदेखील तक्रारी करण्यात येणार असल्याचे नानाभाऊ यांनी सांगितले.
जामनेरच्या विषयावर सदस्य आक्रमक
जामनेर येथील जिल्हा परिषद मालकीच्या जागेवरील व्यापारी संकुलाबाबत आपण माध्यमांमध्ये वाचले, व्हॉटस्ॲपवर बघितले मात्र, आतापर्यंत हा विषय कुठेही, जि.प.च्या कोणत्याच सभेत पटलावर आला नाही, सदस्यांना याबाबत माहिती नाही, प्रशासनाला वसुलीबाबत काही माहिती आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी केली. आम्ही आता आलोय आम्हाला माहिती नाही, अशी उत्तरे पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मात्र, त्यांनी संताप व्यक्त केला. अल्पबचत भवनातील गाळ्यांपेक्षा हा मोठा विषय असताना यावर चर्चा का झाली नाही, अशीही विचारणा साळुंखे यांनी केली. याबाबत माहिती घेऊन देण्याचे आश्वासन अखेर अधिकाऱ्यांनी दिले. या विषयावरच पंधरा ते वीस मिनिटे चर्चा सुरू होती.