प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करीत असताना कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्याने प्रशासनाच्या नियंत्रणाखाली त्याचे वितरण सुरू झाले. त्यानंतर म्युकरमायकोसिसने डोके वर काढल्याने त्यासाठी उपाययोजना करीत असताना या आजारावर आवश्यक असलेल्या इंजेक्शनचादेखील तुटवडा असल्याने त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले व त्याच्या पुरवठ्यासाठीही सूचना देण्यात आल्या. एकीकडे हे आव्हान असताना जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस येत नसल्याने त्यासाठीही कसरत करावी लागली होती. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यानंतर हा प्रश्न समोर आला. त्यानंतर या वयोगटातील लसीकरणच थांबविण्यात आले. आता ३० वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर अचानक ५० टक्के ॲपवर नोंदणी व ५० टक्के कुपन पद्धतीने लसीकरणाच्या सूचना मिळाल्या. यामुळे रविवारी चांगलाच गोंधळ झाला. अशीच स्थिती राहिल्यास कोणत्या ५० टक्के व्यक्तींना कुपन द्यावे, कोणी नोंदणी करावी, असा प्रश्न निर्माण होत असून, ज्यांना नोंदणी करावी लागत आहे, ते आम्हालाच का नोंदणीची सक्ती, असा प्रश्न रविवारपासूनच केला जात आहे. सोमवारी तर लसीकरण बंद होते; मात्र ते पुन्हा सुरू झाल्यानंतर असे प्रश्न उपस्थित होणार असल्याने प्रशासनाची यामध्येदेखील कसरत होते की काय, अशीच स्थिती लसीकरणामध्ये निर्माण झाली आहे.
लसीकरणासाठी पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:12 AM