लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीचा साठा कमी व लस घ्यायला येणारे अधिक अशी परिस्थिती असल्याने शिवाजीनगरातील शंभर ते दीडशे नागरिकांनी लस न मिळाल्याने मंगळवारी दुपारी संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र, साठा उपलब्ध नसल्याने आम्ही काय करणार असे सांगत डॉक्टरही हतबल झाले होते. शहरातील अन्य केंद्रांवरही लसीकरणासाठी गर्दी उसळली होती.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला नागरिकांची गर्दी होत असून, त्या मानाने लसीचे डोस कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेता परतावे लागत आहे. रविवारी सायंकाळी २५ हजार डोस प्राप्त झाले होते. त्यातील प्रत्येक केंद्रांना कमीअधिक प्रमाणात डोसचे वाटप करण्यात आले होते. यातील शिवाजीनगर केंद्रावर मंगळवारी सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली होती. यात ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती, त्यांना प्राधान्याने लस दिली जात होती. मात्र, नोंदणी नसलेल्यांना बाहेर थांबावे लागत असल्याने आम्ही दोन ते तीन दिवसांपासून येत असून, चार-चार तास लाईनमध्ये थांबूनही लस मिळत नसल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी येत नागरिकांची समजूत घातली होती. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोव्हॅक्सिनचे २४०० डोस
कोव्हॅक्सिनचे २४०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. मागणीनुसार केंद्रांना ते देण्यात येणार आहे. हे डोस अगदीच अत्यल्प असून, एका दिवसासाठीही पुरेसे नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी जिल्हाभरात ३५५५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर २८२० लोकांनी लसीचा दुसरा डोस घेेतला. सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक १७ हजारांवर लसीकरण झाले होते.