लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून खुल्या
प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, पाच ते सहा महिन्यांपूर्वी अर्ज करूनसुद्धा शुक्रवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गोंधळ घातल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी तीन वाजता झाला.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे़ उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठीचा लाभ मिळावा यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयात ऑनलाइन अर्ज करून त्याची हार्डकॉपी सादर करावी लागते. जळगाव जिल्ह्यातील एमबीए व अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला होता. मात्र, अनेक वेळा चकरा मारूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते़ अखेर प्रवेशाची शेवटची तारीख येऊन धडकली. त्या दिवशीही सकाळपासून येऊन प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहू या भीतीने विद्यार्थी संतप्त झाले. दुपारी उशिरापर्यंत काहीच हालचाली न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला़ या वेळी रामानंदनगर पोलिसांनासुद्धा पाचारण केले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची मुदतवाढीसाठी बैठक सुरू असल्याचे कळविल्यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान, पाच ते सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी अर्ज करूनसुद्धा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पडताळणी कार्यालयाच्या गलथान कारभाराविरुद्ध विद्यार्थीवर्गातून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.