जळगाव - मासिक पाळीतून असह्य वेदना झेलल्या. रक्तही आटत गेले. तेव्हा व्यथित पती रवींद्रही हतबल झाला.आयुष्याची सहवाहिनी ‘रेखा’ही निस्तेज झाली आणि जागीच कोसळली. धडपड करीत रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले. तेव्हा रेखाच्या शरीरातल्या आटलेल्या रक्ताने मरणाच्या दारीच आणून सोडल्याचे निदान झाले. तेव्हा खिशात दमडीही नसलेला रवींद्र रक्तपेढीचे दरवाजा ठोठावू लागला. त्याचा आक्रोश पाहून रक्तपेढीनेही ‘जीवनदान’चे अस्त्र हाती घेतले आणि ‘रेखा’च्या आयुष्याला धोक्याच्या सिमेबाहेर आणून ठेवले.
जरंडी (सोयगाव) येथील रेखा रवींद्र अंभोरे (वय ३५) या विवाहितेचा हा वेदनादायी प्रवास. अंभोरे कुटूंबाचे पोट तसे मोलमजुरीवरच आधारलेलं. पाच दिवसांपूर्वी रेखाची प्रकृती अतिशय नाजूक झाली.‘रेखा’च्या आयुष्यातील अशक्तपणानेही सीमा ओलांडली होती. म्हणून तिचे निस्तेज शरीर क्षणाक्षणाला गळून पडत होतं. तिचा पती रवींद्रही हतबल झाला. तेव्हा त्याने पत्नीला रुग्णवाहिकेत निजवलं आणि थेट जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
रेखाच्या रक्त चाचण्या झाल्या.तेव्हा रेखाचा प्राणवायू वाहून नेणारे हिमोग्लोबीन केवळ ३ टक्के इतकेच असल्याचे निदान झाले.तातडीने रक्त आणा म्हणून फाटक्या रवींद्रला फर्मान निघाले. तेव्हा तो शेजारीच असणाऱ्या रेडक्रॉस रक्तपेढीच्या पायऱ्यांवर आला.तिथल्या प्रक्रियेविषयी अनभिज्ञ असलेला रवींद्र चक्रावून गेला. काय करावं, तेही त्याला सुचत नव्हते. तेव्हा रक्तपेढीतल्या उज्ज्वला वर्मा यांनी रवींद्रकडे विचारपूस केली. परिस्थिती समजल्यावर रवींद्रला पैसे भरायला लावले. पण रवींद्र आयुष्यच फाटके होते. मग खिशांचा तर विषयच नव्हता. तेव्हा ‘रेखा’च्या उपचारात नियमांचा पाढा आडवा येत गेला.
रवींद्र हताश झाला आणि त्याने रक्तासाठी आक्रोश सुरु केला. हा आक्रोश पाहून वर्मांनीही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला. तेव्हा रेखाचे आयुष्य नाजूकपणाच्या खाटेवर निजलं आहे, याची जाणीव झाली. तेव्हा वर्मांनी एका डॉक्टरांकरवी ‘जीवनदान’ योजना हाती घेतली आणि रवींद्रच्या हातात रक्ताची पिशवी ठेवली.पिशवी हातात पडताच सुखावलेला रवींद्र क्षणातच रुग्णालयाकडे धावला. गेल्या दोन दिवसात रक्ताच्या दोन पिशव्या मिळाल्यावर ‘रेखा’च्या श्वासालाही सतेजपणाची किनार जुळली आहे. म्हणून रवींद्र दिवसरात्र अर्धांगिनीच्या सेवेत कायम आहे....पुन्हा ‘रवी’ आयुष्याची ‘रेखा’ तेजाळून निघेल, या आशेने.
ममत्वाच्या वेदनांनी श्रावणही दुरावला...
रेखाला रुग्णालयात दाखल करताना त्यांचा तान्हुला श्रावणही सोबतीला होता. मात्र ममत्वाच्या वेदना पाहून तोही हतबल झाला.तान्हुल्या श्रावणालाही आजारपण हेरणार, या भितीने त्याला दुसऱ्यादिवशी गावी धाडण्यात आले.