लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या विविध संघटनांचा स्वतंत्र तीन ते चार तास अजिंठा विश्रामगृहात आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या निवडणुका तसेच उमेदवारी देण्यावरून कार्यकर्त्यांनी त्यांच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. आगामी निवडणुकांमध्ये सर्वेक्षण करूनच उमेदवारी दिली जावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. दरम्यान, पक्षातील जिल्ह्याची रिक्त पदे येत्या आठवड्याभरात भरली जातील, असे आमदार शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.
आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असून नाशिक, नगरचा दौरा आपण आधीच केला असून जळगावात पदाधिकाऱ्यांची भेट व सर्वच आघाड्यांचा आढावा घेण्यासाठी आपण आज जळगावात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसमध्ये जी पदे रिक्त आहेत, त्यांचा आढावा घेण्यात आला असून येत्या आठवडाभरात काँग्रेसच्या महानगराध्यक्षपदासह अन्य रिक्त पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून या पदांवरून सुरू असलेली रस्सीखेच बघता आगामी आठवडाभरातच ही पदे कशी भरली जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान बैठकीला, युवक काँग्रेसचे डॉ. हितेश पाटील यांनी भूमिका मांडत कामे बघून व सर्वेक्षण करूनच आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
सरकार आपले असतानाही दाद मिळेना
शहरातील एका लहान बालकाच्या कुत्र्याचा हल्ल्यात मृत्यू झाला. महापालिकेने कुठलाही पंचनामा न करता त्याचा दफनविधी उरकला, या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत मिळावी, अशी मागणी आपण वारंवार केली. महिला व बालविकास मंत्री यांना निवेदन दिले, मात्र, त्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. आपले सरकार असताना दाद मिळत नसून वरिष्ठ आम्हाला थेट भिडा असे सल्ले देतात, काय करावे, असा प्रश्न एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. ते अन्य प्रश्न मांडत असताना पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले.
प्रचंड गर्दी
दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास अजिंठा विश्रामगृहात प्रचंड गर्दी उसळली होती. एकीकडे प्रशासनाकडून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना गर्दी टाळण्याच्या सूचना असताना काँग्रेसच्या या आढावा बैठकीमुळे अजिंठा विश्रामगृहाला यात्रेचे स्वरूप आले होते. आत सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती, या प्रचंड गर्दीत तुम्ही जसे सोशल डिस्टन्सिंग पाळतात, तसेच आम्ही पाळतो, असे उत्तर गर्दीच्या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी दिले.
सोशल डिस्टन्सिंगवर नाराजी
आमदार प्रणिती शिंदे या व्हीआयपी कक्षात बसलेल्या असताना या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने त्या बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल असे सांगत त्यांनी दोन वेळा जागा बदलली, त्यानंतर त्या आढावा घेण्यासाठी गेल्या. या ठिकाणीही सर्वांनी मास्क लावूनच ठेवावे, असे त्या वारंवार सांगत होत्या. मात्र, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी केली होती. याबाबत काही प्रमाणात आमदार शिंदे यांनी नाराजीही व्यक्त केली.
पालकमंत्र्यांची भेट आणि गर्दी
आमदार प्रणिती शिंदे या आढावा घेत असतानाच अजिंठा विश्राम गृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले होते. त्यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना आमदार शिंदे आढावा घेत असल्याची कल्पना दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या कक्षात बसले होते. आढावा संपल्यानंतर निघत असतना आमदार प्रणिती शिंदे या बाहेर जात असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली व त्या नंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटायला गेल्या. या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली होती, अक्षरश: कार्यकर्त्यांमध्ये लोटालोटी झाली हेाती. विचारपूस करून आमदार शिंदे या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.