सुनील पाटील, जळगाव, लोकमत न्यूज नेटवर्क|
जळगाव : महाविकास आघाडीमधील सहभागी इतर घटक पक्षांसोबत वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई शहरासाठी देखील तीन नेत्यांची स्वतंत्र समिती आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेल्या समितीचे नेते १० ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार आहेत. विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचे स्थान मिळवले. विधानसभेतही पहिल्या क्रमांकावरच येण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई प्रादेशिक काँग्रेस समिती स्थापन केलेली आहे. या समितीमधील नेते महाविकास आघाडीमधील सहभागी इतर घटक पक्षांसोबत वाटाघाटीत सहभागी होतील व अंतिम निर्णय दिल्लीला कळवतील. याच नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले असून १० ऑगस्टपासून दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेसने ११ जागांसाठी तयारी केलेली असली तरी महाविकास आघाडीत ठरलेला निर्णयच अंतिम राहणार आहे. आम्ही आमचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना सादर केलेला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
अशा आहेत समित्यामहाराष्ट्र प्रदेश कमिटीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ.नितीन राऊत, अरिफ नसीम खान व सतेज उर्फ बंटी पाटील यांचा समावेश आहे तर मुंबईसाठी स्थापन झालेल्या कमिटीत वर्षा गायकवाड, अशोक उर्फ भाई जगताप व अस्लम शेख यांचा समावेश आहे.