Congress: जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये भाकरी फिरेना आणि पक्षही वाढेना, राजीनाम्याच्या इशाऱ्यामुळे टळला निर्णय?

By अमित महाबळ | Published: September 20, 2022 02:23 PM2022-09-20T14:23:50+5:302022-09-20T14:24:24+5:30

Congress: गटबाजी आणि पदे मिरविणाऱ्यांमुळे जळगाव जिल्हा काँग्रेसची दारुण अवस्था झाली असून, भाकरी फिरविताना आपल्याच हाताला चटके बसू नयेत म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते जळगावपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आहेत

Congress: In Jalgaon District Congress, bread does not circulate and the party does not grow, the decision was avoided due to the resignation notice? | Congress: जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये भाकरी फिरेना आणि पक्षही वाढेना, राजीनाम्याच्या इशाऱ्यामुळे टळला निर्णय?

Congress: जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये भाकरी फिरेना आणि पक्षही वाढेना, राजीनाम्याच्या इशाऱ्यामुळे टळला निर्णय?

googlenewsNext

- अमित महाबळ
जळगाव - गटबाजी आणि पदे मिरविणाऱ्यांमुळे जळगाव जिल्हा काँग्रेसची दारुण अवस्था झाली असून, भाकरी फिरविताना आपल्याच हाताला चटके बसू नयेत म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते जळगावपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे भाकरी फिरेना आणि पक्ष वाढेना, अशी स्थिती पक्षाची झाली आहे.
जिल्हा काँग्रेसने एकेकाळी एकाचवेळी साडेतीन मंत्री राज्याला दिले आहेत. पण ते वैभव आता राहिले नाही. आता तर पक्षाचा एकच आमदार आहे. पुढील निवडणुकीत संख्याबळ घटण्याची साशंकता पक्षात आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व माजी जिल्हाध्यक्ष जी. एन. पाटील यांचा पहिला, आमदार शिरीष चौधरी यांचा दुसरा आणि असंतुष्टांचा तिसरा मोठा गट पक्षात आहे. कोणत्या गटाने पक्षासाठी किती व काय केले याची जी चर्चा कानावर येते ती पक्षाच्या वाढीसाठी फारशी आशादायी नाही. संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात नाही. नियुक्त्या रखडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फटका बसला आहे. निष्ठावंत पक्षापासून दूर गेले आहेत. कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

वेगळ्याच कारणांची चर्चा
महापालिका, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा, शिंदे गट, शिवसेना, राष्ट्रवादी यांची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये मात्र काहीच हालचाल दिसत नाही. जळगावचे प्रभारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पक्षात भाकरी फिरेल, असे म्हटले जात होते. देशमुख यांच्या दौऱ्याची तारीख आली, पण लागलीच तो रद्दही झाला.

नियंत्रणाचा अट्टहास
पक्ष वाढावा म्हणून असंतुष्टांचा मोठा गट आग्रही असताना, त्यांच्या विरोधातला गट आपल्याकडेच नियंत्रण हवे म्हणून अट्टहास करत आहे. भाकरी फिरू नये म्हणून ‘महत्त्वा’च्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा प्रदेशला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशचे पदाधिकारी ठोस निर्णय घेण्यास धजावत नसल्याचे कळते.

‘उत्तम’होईल पण संधी केव्हा?
पक्षाचे काम उत्तम होण्यासाठी इच्छुक अनेक आहेत. मात्र, त्यांना संधी मिळणार केव्हा, या प्रश्नाचे उत्तर प्रदेशकडून मिळत नसल्याने पक्षात निराशा आहे. जो सर्वार्थाने ताकद देईल तोच पक्षाचे भले करू शकेल हे प्रदेशने लक्षात न घेतल्यास पक्षाची आणखी वाताहात व्हायला वेळ लागणार नाही. जो काम करेल, त्याला संधी मिळायला हवी. पुढच्या सहा महिन्याने भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केल्यास तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असाही सूर आहे.

प्रदेश प्रतिनिधींच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
प्रदेश प्रतिनिधी निवडणुकीद्वारे नियुक्त होतात. परंतु, निवडणुका प्रत्यक्षात झाल्या आहेत का, केव्हा घेतल्या गेल्या, त्यासाठी निरीक्षक केव्हा आले होते, ज्या तालुक्यात रहिवास आहे त्या भागाचे प्रतिनिधित्व किती जणांना मिळाले आहे, पक्षवाढीसाठी व सदस्य नोंदणीसाठी योगदान देणाऱ्या किती जणांना संधी मिळाली आहे, प्रोसिडिंगवर स्वाक्षरी करणाऱ्यांचे पक्षातील योगदान काय या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पक्षातून जोर धरत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया कागदावर पार पाडण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. प्रदेशने याची शहानिशी केली पाहिजे, असाही सूर पक्षात आहे.

Web Title: Congress: In Jalgaon District Congress, bread does not circulate and the party does not grow, the decision was avoided due to the resignation notice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.