काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा फैजपूरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:40 PM2018-09-26T15:40:50+5:302018-09-26T15:43:08+5:30
कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर येथून ४ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
जळगाव : कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर येथून ४ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण जिल्ह्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान फैजपूर, बोदवड, भुसावळ व एरंडोल येथे सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा तसेच शहरातील पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रपरिषदेत या यात्रेबाबत माहिती देण्यात आली.
संघर्ष यात्रेत रथ असेल. हा रथ नंतर बोदवड येथे जाईल. तेथे दुपारी ४ वाजता, तर भुसावळ येथे सायंकाळी ६ वाजता सभा होईल. या दिवशी सर्व नेते जळगाव येथे मुक्कामी असतील.
अशोक चव्हाण व अन्य नेते ५ रोजी जळगाव येथे सकाळी ९ ते १० या वेळात शहरातील विविध क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधतील व पक्षाची भूमिका, केंद्र व राज्यातील सरकारकडून सुरू असलेली दडपशाही, महागाईचे धोरण याबाबत भूमिका मांडतील. यानंतर ही यात्रा एरंडोलकडे रवाना होईल. एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ११ ते १२.३० या वेळात जाहीर सभा होईल. त्यानंतर पारोळा येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार असून तेथून अमळनेरकडे यात्रा रवाना होईल. अमळनेर येथेही यात्रेचे स्वागत होईल. अमळनेर येथून ही संघर्ष यात्रा धुळे जिल्ह्यात प्रवेश करेल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे रॅली व सभा होईल.