जळगाव : सेवाग्राम येथून केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर आता राज्यातील फडणवीस सरकारविरोधात काढण्यात येत असलेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून होत आहे. फैजपूर येथे १९३६ मध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह राष्ट्रीय चळवळीतील अनेक नेते दोन दिवस फैजपूर येथे मुक्कामी होते.
या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेत्यांची मांदियाळी जमणार आहे. फैजपूरमध्ये दुपारी १२ वाजता सभा होईल. यानंतर मुक्ताईनगरमार्गे बोदवडकडे ही रॅली रवाना होईल. बोदवड येथे दुपारी ३.३० तर भुसावळमध्ये सायंकाळी ६.३० वाजता सभा होणार आहे. रात्री ९ वाजता यात्रा जळगावात मुक्कामी येईल.