काँग्रेस-राष्ट्रवादीला चक्क भोपळा, सेनेला पछाडत भाजपच सत्ताधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 08:25 PM2018-08-03T20:25:02+5:302018-08-03T20:25:32+5:30
राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
जळगाव - राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या सांगली महापालिकेतही भाजपने मोठा विजय मिळवला आहे. गतवर्षीच्या 6 जागांवरुन थेट 41 जागांवर भाजपला विजय मिळाला. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला जळगावमध्ये भोपळाही फोडता आला नाही. जळगावमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला एकही जागा जिंकला आली आहे.
राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मोठा धक्का देत भाजपानं जळगाव महानगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर, काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या सांगली-मिरज-कुपवाडमध्ये दणदणीत विजय मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जळगाव मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. तर यंदा मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, या आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. तर शिवसेनेला केवळ 15 जागा जिंकता आल्या आहेत.
जळगाव महापालिका प्रचारासाठीही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली नव्हती. मात्र, 2019 साली महाराष्ट्र काबिज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने आणि सांगलीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे परिश्रम घ्यावे लागणार असल्याचेच दिसून येते. दरम्यान, सांगली महापालिकेत शिवसेनेला एकही जागा जिंकला आली असून भाजपने 41 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.