अमित महाबळ, जळगाव : शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा कांदा भजी तळून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. इच्छादेवी चौकात हे आंदोलन करण्यात आले. तळलेली भजी नंतर या भागातील जनतेमध्ये वाटण्यात आली.
सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही देशातील युवकांना मोदी सरकार आश्वासनानुसार रोजगार देऊ शकले नाही. युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन पाळून याचा निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत इच्छा देवी चौकात आंदोलन करण्यात आले. पाच किलो कांदा भजी लोटगाडीवरील भट्टीवर तळण्यात आली. भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पटेल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनु सोनार, आशिष पाटील, नयन कोळी, नीलेश पाटील, जमील शेख, टिपू बागवान, इसा व्यापारी, विजय चौधरी, राजू पाटील, भगवान सिंग पाटील, लोकमान शेख, ईबा बागवान आदी उपस्थित होते.