फोटो नंबर : ११सीटीआर ०६, ०३,०४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या रॅलीसाठी सायकली गोळा होत नसल्याने हे आंदोलन दीड तास उशिराने सुरू झाले, शिवाय रिक्षातून सायकल काँग्रेस भवनात आणून मग रॅली काढण्यात आली. आमदार शिरीष चौधरी व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी या रॅलीत साधारण पाच किमीपर्यंत सायकल चालविली.
काँग्रेस भवनापासून घोषणा देत, नेहरू चौकातून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली होती. तिथून परतून पुन्हा काँग्रेस भवनात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी विविध चौकांत थांबून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यात एकूण २२ सायकलींवर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस भवनापासून जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी प्रदेश चिटणीस डी. जी. पाटील यांचीही उपस्थिती होती, तर सायकल रॅलीत आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, प्रदीप सोनवणे, डॉ. जगदीश पाटील, जमील शेख, जलील पटेल, ज्ञानेश्वर कोळी, मनोज सोनवणे, मुक्तदीर देशमुख सहभागी झाले होते.
रॅली संपताच सायकल फेकली
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली संपल्यानंतर, एका कार्यकर्त्याने काँग्रेसचा झेंडा असलेली सायकल बाजूला फेकून मोटारसायकलवर पुढील आंदोलन केले. नंतर ही सायकल उचलण्यात आली. काहींनी केवळ फोटो काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायकल चालविली.
कामावर जाणाऱ्यांची सायकल आणली
सायकलची जमवाजमव करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. यात एकजण शिदोरी घेऊन कामावर निघत असताना, त्याची सायकली या रॅलीत सहभागी करून घेण्यात आली होती. या सायकलला जेवणाचा डबा लटकवलेला असतानाच, त्यावर पक्षाचा झेंडा बांधण्यात आला. विशेष बाब म्हणून, दोन रिक्षांमधून सायकली पक्ष कार्यालयात आणण्यात आल्या.
...तर सामान्यांचा संताप अनावर
पेट्रोल दरवाढ झाली असताना, पेट्रोलपंपांवर मोदींचा फोटो पाहून सामान्यांना संताप होत असून, ही पेट्रेाल दरवाढ कमी न केल्यास सामान्य जनता आता मोदींच्या फोटोला शेण फासल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना केला.