लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसची राज्यपातळीवर मुंबई येथे वॉर रूम असून, त्या धर्तीवर जळगावातही अशा प्रकारची वॉर रूम स्थापन करून रुग्णांच्या समस्या काँग्रेसतर्फे सोडविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. केंद्राकडून लसीचा मुबलक पुरवठा व्हावा, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, जिल्हा सरचिटणीस जमील शेख आदी उपस्थित होते. काँग्रेस भवनात काही पदाधिकाऱ्यांचा व डॉक्टरांचा सहभाग असलेली ही वॉर रूम उघडण्यात येणार आहे. यात रुग्णांच्या बेड मॅनेजमेंटचा विषय, रेमडेसिवीर इंजेक्शन, तसेच अन्य समस्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले. यासह राज्यात सद्य:स्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, तो दूर करण्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी व १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तालुकास्तरावर कोरोनाचे नियम पाळून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दुसरी लाट गंभीर
कोरोनाची दुसरी लाट ही वेगळी असून, यात कोरोना या विषाणूचा नाकातून फुप्फुसांपर्यंतचा प्रवास हा आता काही तासांचा किंवा काहीच दिवसांचा झाला आहे. त्यामुळे तातडीने रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. अशा स्थितीत सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा जागेचा असून, रुग्णांना बेडची व्यवस्था लागत आहे. अशा स्थितीत काँग्रेस मदतीसाठी सरसावली आहे. बेडबाबत काँग्रेसच्या या वॉर रूमधून मार्गदर्शन होईल, यासह ऑक्सिजनचा जो तुटवडा आहे, त्यावरही काँग्रेसकडून लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राच्या भूमिकेचा निषेध
केंद्राकडून लसीचा मुबलक पुरवठा न करता राजकारण केले जात आहे. मात्र, अशा स्थितीत सर्वांनी एकत्र येऊन या संकटावर मात करायची आहे. त्यामुळे केंद्राच्या या भूमिकेचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. ‘कोरोना जोमात, केंद्राचे लसीकरण कोमात’, ‘लढा कोरोनाचा, की खेळ केंद्र सरकारचा’, अशा आशयाचे फलक यावेळी काँग्रेसकडून दाखविण्यात आले.