काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस जळगावमधील फैजपूर येथून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:10 PM2018-10-04T13:10:25+5:302018-10-04T15:09:35+5:30
काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. फैजपूर, भुसावळ व बोदवड येथे सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.
फैजपूर, जि. जळगाव : काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. फैजपूर, भुसावळ व बोदवड येथे सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.
फैजपूर येथे १९३६ मध्ये कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दुस-या टप्प्यातील रॅलीचा शुभारंभ फैजपूर येथून करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात ही रॅली काढण्यात येत आहे. यासाठी फैजपूर येथे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि ५० आमदार उपस्थित आहेत.
फैजपूरमध्ये सभा झाल्यानंतर मुक्ताईनगरमार्गे बोदवडकडे ही रॅली रवाना होईल. बोदवड येथे दुपारी ३.३० रॅली व सभा होईल. आणि भुसावळमध्ये सायंकाळी ६.३० वाजता सभा होणार आहे. भुसावळच्या सभेत इम्रान प्रताप गढी मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर रात्री ९ वाजता जनसंघर्ष यात्रा जळगावात मुक्कामी येईल.
जळगावात साधणार संवाद
जळगाव येथे ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळात शहरातील अधिवक्ता, डॉक्टर व इतर व्यासायिकांशी अशोक चव्हाण व अन्य पदाधिकारी संवाद साधणार आहेत. यांनतर एरंडोल येथे सकाळी १०.४५ वाजता सभा व त्यानंतर पारोळ्याकडे ही रॅली जाईल. पारोळा व त्यानंतर अमळनेर येथे रॅलीचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन केले आहे.
फैजपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी
कॉँग्रेसची १८८५ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर पक्षाचे ५१ वे राष्टÑीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे १९३६ मध्ये घेण्याचा निर्णय पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन फैजपूर येथे झाल्याने एक ऐतिहासिक दर्जा या गावाला प्राप्त झाला. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या सारख्या दिग्गज मंडळी दोन दिवस फैजपूर येथे होत्या. ही ऐतिहासीक पार्श्वभूमी फैजपूरला असल्यामुळे पक्षाने आपल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसºया टप्प्याला फैजपूर येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला.