जळगाव : चिठ्ठ्यांवरील सट्ट्यावर होणारी कारवाई लक्षात घेता त्याला पर्याय म्हणून सटोड्यांनी आॅनलाईन मोबाईलवर सट्टा जुगार सुरु केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी दीड वाजता शहरातील सिंधी कॉलनीत धाड टाकली असता आकाश प्रकाश सेंधवानी (२२, रा.सिंधी कॉलनी) याला मोबाईलवर सट्टा घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.दरम्यान, सेंधवानी याच्याकडून ९ हजार ५३० रुपये रोख व ५ हजार रुपयांचा मोबाईल असा १४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या सट्टयाचे कनेक्शन पाचोरा व चोपडा येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिंधी कॉलनीतील शिला प्राईड अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर आॅनलाईन सट्टा घेतला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, विजय पाटील, शरद भालेराव, सुनील दामोदरे, रामकृष्ण पाटील व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.या पथकाने दोन दिवस पाळत ठेवून मंगळवारी दुपारी शिला प्राईड अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये मोबाईलवर सट्टा घेताना आकाश याला रंगेहाथ पकडण्यात आले.मुख्य सूत्रधार चोपडा व पाचोऱ्यातपोलिसांनी आकाश याची चौकशी केली असता हा सट्टा आपण पाचोरा येथील नितीन व चोपडा येथील बंटी यांच्या सांगण्यावरुन घेत असून तेच मुख्यसूत्रधार आहेत, आपण केवळ टक्केवारीवर काम करीत असल्याचे त्याने सांगितले. आकाश याला अटक करण्यात आली असून रामकृष्ण साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन सट्ट्याचे चोपडा, पाचोरा येथे कनेशक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:49 PM