सर्वपक्षीय नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, भाजपचे घनश्याम अग्रवाल, माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, चंद्रहास गुजराथी यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कामगारांची कारखाना साईटवर असलेल्या दत्त मंदिराच्या ओट्यावर बैठक घेतली. या बैठकीस जवळपास दोनशे ते अडीचशे कामगार उपस्थित होते.
या बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावाबाबतची माहिती ठाकरे यांनी कारखान्याच्या कामगार संघटना पदाधिकारी आणि कामगारांसमोर ठेवली. भाडेतत्त्वावर दिल्यानंतर कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न हा सध्या न्यायालयीन असल्याने तो निकाल लागल्यानंतर व कारखाना सुरू असताना टप्प्याटप्प्याने मागील वेतन अदा केले जाईल. सध्या मात्र ज्या वेळेस पुन्हा कारखाना सुरू होईल, त्यावेळेस नियमित वेतन कामगारांना मिळेल. म्हणून मागच्या वेतनाच्या मागणीचा प्रश्न कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यानंतर, जसे पैसे उपलब्ध होतील, तसतसे दिले जातील, असा प्रस्ताव ठेवला.
यास सर्व कामगारांनी एकमुखाने संमती दिली आणि भाडेतत्त्वावर दिल्यानंतर नियमित पगारावर कारखाना सुरू व्हावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केल्याची माहिती अतुल ठाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारखान्याच्या असलेल्या कार्यालयात दिली. यावेळी संचालक प्रवीण गुजराथी, नीलेश पाटील, संभाजी गोरख पाटील, विजय दत्तात्रय पाटील, सुनील महाजन, आनंदराव शंकर रायसिंग, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, सचिव आधार पाटील, हिशेबनीस अनिल पाटील, आदी उपस्थित होते.
२७ला शेतकऱ्यांची बैठक
दरम्यान चो. सा. का. भाडेतत्त्वावर देण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सर्व पक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी सभासद यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. दि. २७ जून रोजी दुपारी एक वाजता कारखाना साईटवर बैठक आयोजित केली आहे. बैठकीला सर्व शेतकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून, सुरक्षित अंतर राखून उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशी देवरे यांनी केले आहे.