ममुराबाद, ता. जळगाव : कोरोनामुळे दुधासह दुग्धजन्य पदार्थ्यांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून काही महिन्यांपासून उत्पादकांना दरवाढ देण्यात आली नव्हती. मात्र संघाने आता गायीच्या दूध खरेदीदरात १.२० रुपये तसेच म्हशीच्या दूध खरेदीदरात तीन रुपये प्रतिलिटरप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून होणार आहे.कोरोनामुुळे लॉकडाऊन असल्याने जनजीवन ठप्प झालेले असताना जळगाव जिल्हा दूध संघाच्या वितरण व्यवस्थेवरसुद्धा त्याचा विपरित परिणाम झाला. दुधासह तूप, बटर, पावडर यांची विक्री मंदावल्याने प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून संघाला नियमित दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना योग्य खरेदीदर प्रशासनाला देणे शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात शासनाकडून अनुदानाचा टेकू मिळाल्याने थोडीफार मदत झाली. मात्र, एक आॅगस्टपासून शासनाची दूध अनुदान योजनाही बंद झाली आहे. सद्य:स्थितीत संघाचे दैनंदिन दूध संकलन सुमारे एक लाख ९७ हजार लिटर इतके असले तरी दुधाचा दैनंदिन खप जेमतेम एक लाख ५५ हजार लिटर इतकाच आहे. अशा परिस्थितीत संकलन आणि वितरण यांचा ताळमेळ साधून दूध उत्पादकांचे हीत साधण्याचा प्रयत्न संघाकडून होत आहे.शनिवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतही सवार्नुमते गाय व म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार एक सप्टेंबरपासून उत्पादकांना गायीच्या ३.५ फॅट व 8.5 टक्के एसएनएफ दुधाला २६.४० रुपये प्रतिलिटर आणि म्हशीच्या ६.० फॅट टक्के एसएनएफ असलेल्या दुधाला ३९ रुपए प्रतिलिटर प्रमाणे खरेदीदर देण्यात येणार आहे. विक्रीच्या दरात मात्र कोणतीच वाढ होणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.सध्या संघाकडे सुमारे ५० हजार लिटरवर अतिरिक्त दूध असतांनाही उत्पादकांचे हीत साधण्यासाठी खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दूध संघावर महिन्याकाठी तब्बल १ कोटी २५ लाखांचा आर्थिक बोझा पडणार आहे.-मंदाकिनी खडसे, अध्यक्ष, जळगाव जिल्हा दूध संघ
दूध संघाकडून उत्पादकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:26 PM