चाळीसगांव : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ९ रोजी शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या ४ कब्रस्थानमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातुन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३३ टन ५०० किलो सुका व ओला कचरा संकलित केला. तसेच भडगावात १७७ सदस्यांनी ३७ टन, पाचोरा येथे १९० सदस्यांनी १६ टन ५०० किलो तर पारोळा येथून ११२ सदस्यांनी १२ टन असा एकंदरीत विभागातून ९९ टन कचरा संकलित केला.सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानात ५३७ सदस्य सहभागी झाले होते. चार ठिकाणी सदस्यांची विभागणी करण्यात आली होती. यात धुळे रोडवरील कोतकर कॉलेज समोरील कब्रस्थान, पाटणादेवी रोडवरील रोशनगेट समोरील कब्रस्थान, बामोशी बाबा दर्गा ट्रस्ट मागील कब्रस्थान तसेच चामुंडा माता मंदिर परिसरातील तितुर नदी पात्रातील कब्रस्थान या चार ठिकाणी सदरचे अभियान राबविण्यात आले.डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छतेसोबत जातीय सलोख्याचा आगळा वेगळा संदेश यातून दिला आहे.यावेळी नगसेवक रविंद्र गिरधर चौधरी, नगरसेवक चिरागोद्दीन शेख, सय्यद सलीम सय्यद अजीज, जब्बार बागवान, अजीज मिर्झा, रसूल शेख, राजू खान, जमिल मुजावर, मूजीब मुजावर आदि उपस्थित होते. स्वच्छता अभियान उपक्रमास मुस्लिम समाज ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.५३७ श्री सदस्यांचा सहभागस्वच्छता अभियानासाठी प्रतिष्ठानचे ५३७ श्री सद्स्य सहभागी झाले होते. यात ग्रामीण भागातील पातोंडा, देवळी, सायगाव ,दहिवद ,तांबोळे ,ढेकू, वाखारी, न्यायडोंगरी, मेहुणबारे, भोरस, मुंदखेडा, रांजणगाव व शहरी भागातील कन्नड नांदगाव येथील श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी ट्रॅक्टरसह लहान -मोठे १४ वाहने उपलब्ध झाली होती.पाचोऱ्यात दोन ठिकाणी केली स्वच्छतापाचोरा येथील नूर मशीद कब्रस्थान आठवडे बाजार व झकेरिया जामा मशिद शिवाजी नगर कब्रस्थान या दोन ठिकाणी १९० सेवेकरी श्री सदस्यांनी स्वच्छता केली. यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक गंगाराम पाटील, रशीद बाबू जलील देशमुख, झाकीर साहब आदी हजर होते.
सफाई अभियानात ९९ टन कचरा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 7:12 PM