सावखेडा, ता. रावेर : गौरखेडा, ता. रावेर येथील ग्रामपंचायत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम आपल्या खासगी जागेत करीत असल्याची तक्रार साहेबराव सदाशिव पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी सर्व संबंधिताना पाठविल्या आहेत.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुरुषांसाठी मंजूर झालेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम ग्रामपंचायत माझ्या मालकीच्या (गट नं ५) शेतीच्या जागेत करून माझ्यावर अन्याय करीत आहे. वास्तविक पाहता माझ्या शेताच्या उत्तरेस सुमारे ६० ते ७० फुटाचा रुंदीचा फार मोठा गावठाण जागेचा पट्टा आहे. परंतु या गावठाण जागेच्या उत्तरेस गावाची वस्ती आहे. पूर्वी या वस्तीच्या घराचे दरवाजे उत्तरेकडे होते. परंतु त्यांनी दक्षिणेकडे दरवाजे पाडले. एवढी मोठी गावठाण जागा असताना गावठाण जागेत सार्वजनिक शाैचालय न बांधता माझ्या शेताच्या जागेत ग्रामपंचायत सार्वजनिक शाैचालयाचे बांधकाम करीत आहे.
प्रतिक्रिया-
शौचालयाचे बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतच आहे. ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे. त्या ठिकाणच्या जवळपासच सोयीनुसारच शौचालयाचे बांधकाम ग्रामपंचायतीतर्फे सुरू आहे.
-शबाना रफिक तडवी, सरपंच, गौरखेडा, ता. रावेर
प्रतिक्रिया-
दलित सुधार योजनेअंतर्गत शौचालयाचे बांधकाम माझ्या मालकीच्या जागेत ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. मागील वर्षी जे महिलांचे शौचालय बांधकाम झाले आहे त्याच्या समांतर रेषेने हे शौचालयाचे बांधकाम नसून ते माझ्या गट क्रमांक ५ च्या हद्दीत ग्रामपंचायतीने घेतले आहे.
-साहेबराव सदाशिव पाटील, तक्रारदार, गौरखेडा, ता. रावेर