जळगाव : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना घरावर सौर ऊर्जा निर्मितीची यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘सौरटॉफ’ योजनेंतर्गत ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत गृहनिर्माण संस्थांनाही २० टक्के अनुदान मिळणार असून, या सौर ऊर्जेमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वीजबिलाची बचत होणार आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेनुसार, घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडळात एका खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इन्फो :
‘रूफटॉफ’ योजनेंतर्गत जाहीर केेलेली किंमत
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे सौर ऊर्जा यंत्रणेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह १ ‘किलोवॅट’च्या ऊर्जा निर्मितीसाठी ४६ हजार ८२० रुपये खर्च येणार आहे. तसेच १ ते २ किलोवॅटसाठी ४२ हजार ४७०, २ ते ३ किलोवॅटकरिता ४१ हजार ३८०, ३ ते १० किलोवॅटसाठी ४० हजार २९० तर १० ते १०० किलोवॅटसाठी ३७ हजार २० रुपये प्रति किलोवॅट खर्च येणार आहे. तर या खर्चामध्ये ग्राहकांना ऊर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान मिळणार असल्यामुळे, वरील दाखविलेला खर्च आणखी कमी होणार आहे.
इन्फो :
वीजबिलांंचे टेंशन मिटणार
दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होणार आहे. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या ‘नेटमीटरिंग’द्वारे वर्षाखेर शिल्लक वीज प्रति युनिटप्रमाणे महावितरण विकत घेणार आहे. त्यामुळे ग्राहकांना याचाही आर्थिक फायदा होणार आहे.