लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची साखळी तोडायची असल्यास बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांच्या तपासण्या करून घ्या, अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या आहेत. मात्र, याची हवी तशी अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र आहे. एक व्यक्ती बाधित आढळल्यास त्याच्या कुटुंबीयांना केवळ तपासणी केली आहे का याची विचारणा केली जाते. मात्र, सक्तीने सर्वांची तपासणी होत नसल्याची माहिती आहे.
मध्यंतरीच्या काळात कुटुंबीयही तपासणीला गेले तरच त्यांची तपासणी केली जात होती, अन्यथा विचारणाही होत नसल्याचे गंभीर वास्तव होते. अशी अनेक उदाहरणेही समोर आली होती.
समितीच्या सूचना आणि परिस्थिती
१ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा : शहरात सद्यस्थितीत एका रुग्णामागे ५ ते ६ हायरिस्क कॉन्टॅक्टची चाचणी होत असते. यासह १५ ते २० लो रिस्क संपर्क असलेल्या लोकांना लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी केली जाते.
२ तालुक्यावरील केंद्र सुरू करा : तालुकास्तरावरील ८ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ११ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. काही केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार आहे.
...तर कॉन्टॅक्ट सारखेच
एकाच कुटुंबातील अनेक सदस्य बाधित आल्यानंतर त्यांचे संपर्क हे सारखेच असतात, अशा वेळी ही संख्या घटते. शहरात एका बाधितामागे पाच ते सहा लोकांची तपासणी होत असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केली.