लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मनपा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तसेच शहरात प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका मनपाकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शहरात रुग्णवाढीनंतर तयार करण्यात येत असलेल्या कंटेनमेंट झोनबाबत प्रशासनाकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचे आढळून आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या प्रमाणे कंटेनमेंट झोनमध्ये मनपाकडून उपाययोजना केल्या जात होत्या. तशा उपाययोजना दुसऱ्या टप्प्यात होताना दिसून येत नाही, कंटेनमेंटट केवळ नावालाच आहेत.
‘लोकमत’ने शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागात पाहणी केली. मात्र, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्या भागातील घरंदेखील सील करण्यात आलेली नाहीत किंवा जी खबरदारी घ्यायला हवी, ती या टप्प्यात घेतली जात नसल्याचेच चित्र शहरात पहायला मिळत आहे. एखादा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेणे, घरातील सदस्यांना क्वारंटाईन करणे, त्यांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत थांबविले जात होते. मात्र, अशाप्रकारची कोणतीही प्रक्रिया आता सुरू नसल्याचेच समोर आले आहे.
आरटीपीसीआर करूनही नागरिक फिरतात बिनधास्त
एखाद्या घरात एक रुग्ण बाधित सापडला, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. मात्र, ही चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती घरातच थांबून आहे की नाही याची देखील तपासणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतरही संबंधित व्यक्ती शहरभर बिनधास्त फिरत आहेत. त्यानंतर अनेकांचे अहवाल ही पॉझिटिव्ह येत आहेत. या कारणांमुळे देखील कोरोनाचा फैलाव अधिक होत आहे. शहरात मास्क न लावणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे तर कोरोनाचा बचाव होईल मात्र दुसरीकडे कंटेटमेंट झोनबाबत गांभीर्यच नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूच शकतो.
१११२ रुग्ण मात्र केवळ ३० कंटेनमेंट झोन
शहरात सद्य:स्थितीत एकूण १११२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण जर ११९२ असले तर कंटेनमेंट झोनची संख्यादेखील जास्त असणे अपेक्षित होती. मात्र, शहरात सद्य:स्थितीत केवळ ३० ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन आहेत. यामुळे अनेक भागात कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी त्याठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेले नाहीत.
पहिल्या टप्प्यात केलेल्या मेहनतीवर फिरू शकते पाणी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मनपा प्रशासनाचे आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात मेहनत घेऊन, रात्री-अपरात्रीकंटेनमेंट झोन तयार करून, संबंधित भाग सील करणे, संपर्कात आलेल्या शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे ही कामे तत्परतेने करण्यात आली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कंटेनमेंट झोन, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध याबाबत फार काही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचेच दिसून येत आहे.
ग्रामीण भागात तर रामभरोसे कारभार
जळगाव शहराप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्येदेखील कोरोनाबाबत प्राथमिक आरोग्य प्रशासनाकडून कोणतेही लक्ष दिले जात नसून, कोरोना बाधित आल्यानंतरही त्या भागात जाऊन तपासणी, फवारणी, कंटेनमेंट झोनबाबत कोणतेही लक्ष दिले जात नसल्याचेच पहायला मिळत आहे.
कोट..
मनपाचा भर रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्यावर आहे. कंटेनमेंट झोनबाबत काही पहिल्या टप्प्यापेक्षा काही प्रमाणात शिथिलता करण्यात आली आहे. संबंधित रुग्णांच्या घराशेजारचा २०० मीटरचा भागातील नागरिकांची प्राथमिक तपासणी करून, ज्यांना लक्षणे आहेत. त्यांची तपासणी केली जात आहे.
-श्याम गोसावी, उपायुक्त, मनपा