महिंदळे : परिसरात कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने पिकांवर पांढरा पावडरयुक्त थर साचला आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे व वातावरणात गारवा असल्यामुळे पिकांवर कुकडा, मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारावी लागत आहेत. त्यात हा क्षारयुक्त पाऊस यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पावसामुळे पिकांना काही बाधा होऊ नये, यासाठी शेतकरी पिकांना फवारणी करण्याच्या धडपडीत आहेत. पिकांना या पावसाची बाधा होणार नाही तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोराडे यांनी केले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते हा पाऊस क्षारयुक्त व खारा सोडियमयुक्त असल्याचे सांगण्यात आले. पिकांच्या पानांवर पांढरे डाग व राखेसारखा थर जमा झाला आहे. या पावसामुळे पिकांचे काहीही नुकसान होणार नाही. चांगल्या पावसात हे धुतले जाईल. शेतकऱ्यांनी घाबरू नये व कोणतेही कीटकनाशक मारू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
पावसाचे दोन महिने उलटत आले तरीही दमदार पावसाचे आगमन नाही. रिमझिम पावसाच्या बळावर पीक परिस्थिती चांगली असली तरी पिकांची वाढ खुंटली आहे. रिमझिम पावसामुळे पिकांवर कुकडा, मावा असे अनेक रोग बळावत आहेत. या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारणी करावी लागत आहेत. त्यात काल पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.
प्रतिक्रिया
काल पडलेला पाऊस हा क्षारयुक्त पाऊस होता. असा पाऊस अनेकदा पडला आहे. हा सोडियमयुक्त पाऊस असल्यामुळे पिकांच्या पानांवर पांढरे डाग व पावडरसारखा थर जमा झाला आहे. यामुळे पिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. शेतकऱ्यांनी घाबरू नये व कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक पिकांवर मारू नये. हे डाग पाऊस पडल्यास धुतले जातील. विनाकारण कीटकनाशकांवर खर्च करू नये.
-बी. बी. गोराडे,
कृषी अधिकारी, भडगाव
240721\24jal_1_24072021_12.jpg
काल पडलेल्या पावसामुळे पिकांच्या पानांवर पांढरा पावडरयुक्त थर.