चुडामण बोरसेजळगाव - मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळविली. तशी भाजपचे विरोधक असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीही एकाकी दिलेली चिवट झुंज सगळ्यांच्याच नजेरत भरणारी ठरली. मुक्ताईनगर नगरपंचायतीची ही निवडणूक मुस्लीम, लेवा आणि बौद्ध या तीन समाजाच्या अवती- भवती ही फिरत राहिली.मुक्ताईनगर नगरपंचायतीत १७ पैकी भाजपाला १३ जागा मिळाल्या आहेत. तीन जागा शिवसेनेला आणि एक अपक्ष आहे. एकमेव अपक्ष असलेल्या नुसरतबी मेहबूब खान ह्या भाजपच्याच बंडखोर असल्याचे म्हटले जात आहे. मुक्ताईनगर शहरात मुस्लीम, लेवा आणि बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहेत. हे तीन समाज मतदान फिरवू शकतात, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय निकालात उमटला. भाजपच्या तिकिटावर मुस्लीम समाजाचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. तर एक अपक्ष मिळून ही संख्या आठ आहे.आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कुठलीही निवडणूक लढविणे तसे सोपे नाही. खडसे यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. गेल्या तीस वर्षापासून हेच मतदार त्यांना निवडून देत आहेत. भाऊंचा शब्द मानणारे अनेक जण आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला चार ते पाच ठिकाणच्या जागा वाटपावरुन भाजापात नाराजी होती. शिवाय मुक्ताईनगरचा हवा तसा विकास झाला नाही. अशी भावना लोकांमध्ये होती. शेवटच्या चार ते पाच दिवसात आमदार खडसे स्वत: शहरात फिरले. नाराजांची नाराजी दूर केली. ग्रामपंचायत असल्याने निधीसाठी मर्यादा येतात, आता नगरपंचायतीत कामे होतील आणि ही कामे फक्त नाथाभाऊच करू शकतात, ही भावनाही लोकांमध्ये रुजविण्यात ते यशस्वी झाले आणि इथूनच मग विजयाचा मार्गही सुकर होत गेला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील ह्या शिवसेनेच्या एकांड्या शिलेदाराने एकनाथराव खडसे यांच्याविरुद्ध झुंज दिली. जिल्ह्यातील शिवसेनेची कुठलीही मदत त्यांनी घेतली नाही. तरुण वर्गाचा मोठा गट पाटील यांच्या मागे होता आणि आहे. पाऊस पडल्यावर मुक्ताईनगरातील अनेक रस्त्यांवर होणारा चिखल याबद्दल तर नागरिकांच्या मनात रोष होता. त्याचे रुपांतर मतदानात करुन घेण्यास शिवसेना अपयशी ठरली. याचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी प्लॅटफॉर्म तयार करुन ठेवला, एवढे मात्र निश्चित. त्यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेची रिहर्सल होती.काँग्रेसने या निवडणुकीत सात जागा लढविल्या. एकही जागेवर या पक्षाला विजय मिळू शकला नाही. जिल्ह्यात काँग्रेसला संपविण्यात खडसे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच विरुद्ध काँग्रेसजन उभारी घेत उभे ठाकले. डॉ. जगदीश पाटील यांंनीही एकाचवेळी भाजप आणि शिवसेना यांच्याविरुद्ध लढा दिला. यामुळे किमान काँग्रेसचे अस्तित्व असल्याचे लोकांपर्यंत पोहचले.या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस यांच्यात महाआघाडी करण्याचा प्रयत्न झाला. नंतर नगराध्यक्षपदासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्रारून शिवसेनेने कॉँग्रेसपासून दूर राहणे पसंत केले. आघाडीत पडलेली ही फूट भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे म्हटले जात आहे.