प्रशासन करतेय तरी काय? : बायपासच्या प्रस्तावित पुलासह रेल्वे पुलाखालूनही उपसा सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -दोन आठवड्यांपूर्वी ‘लोकमत’ ने अवैध वाळू उपशाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली; मात्र परत काही दिवसात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. गिरणा पात्रात आव्हाणी येथील वाळूचा ठेका देण्यात आला आहे; मात्र या ठेक्याच्या ठिकाणावरून कमी तर निमखेडी, भोकणी व आव्हाणे शिवारातूनच मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असल्याचे चित्र गिरणा पात्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासन करतेय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून गेल्या महिन्यात काही वाळू ठेक्यांचे लिलाव करण्यात आले; मात्र लिलाव झाल्यानंतरदेखील अवैध वाळू उपसा सुरूच आहे. प्रशासनाकडून कारवाईदेखील करण्यात आली; मात्र या कारवाईनंतर परत काही दिवसातच उपसा सुरू होऊन जातो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची कारवाई औटघटकेचीच ठरत आहे. गिरणा पात्रातील आव्हाणी या ठिकाणचा ठेका देण्यात आला आहे; मात्र आव्हाणीचा ठेका दिला असताना इतर भागातूनदेखील वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे ठेका दिला किंवा नाही दिला, तरीही अवैध वाळू उपसा सुरूच आहे.
बायपासच्या प्रस्तावित पुलाच्या बाजूनेच उपसा
गिरणा नदीत भोकणी शिवारात तयार होत असलेल्या बायपासच्या पुलाच्या बांधकामालगतच मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. आधीच रेल्वे पुलाखालून मर्यादेबाहेर उपसा झाल्यामुळे पुलाचे खांब उघडे पडले आहेत. त्यामुळे पुलालादेखील भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने रेल्वे पूल परिसरात १४४ कलम लावले आहे, तरीदेखील उपसा सुरूच आहे; मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
पुन्हा शेतकऱ्यांचा तोडला रस्ता
निमखेडी शिवारातूनदेखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, काही डंपरचालकांनी भोकणी भागातील काही शेतांकडे जाणारा रस्ता तोडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता शिल्लक राहिलेला नाही. सप्टेंबर महिन्यातदेखील आव्हाणे येथील शेतकऱ्यांचा रस्ता तोडल्याने शेतकऱ्यांनी गिरणा पात्रात १५ तास थांबून जलसत्याग्रह केला होता; मात्र अजूनही शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबलेला नाही.