या निवेदनात नमूद केले आहे की, २०२०पासून ते आतापर्यंत आम्ही कोविड या संसर्गाचा सामना करीत आहोत. आरोग्य विभागातील कर्मचारी आणि विशेष म्हणजे ज्यांच्या कोविडच्या काळात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे सर्व कंत्राटी कर्मचारी हे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत होते व आहेत. आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मग डाॅक्टर, आरोग्य सेविका, परिचारिका, वार्डबाॅय यांची व्यथा मन सुन्न करणारी आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणि गरज संपली की, या कर्मचाऱ्यांना पुन्हा कमी करायचे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत हे शासनाचे धोरण अन्यायकारक आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
करार संपल्यावर शासन या कर्मचाऱ्यांचा कुठेही विचार करताना दिसत नाही. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. संभाव्य धोका पाहता दि. ३० जून २०२१ रोजी करार संपणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे. त्यांना ‘जैसे थे’ स्थितीतच कामावर सामावून घेऊन ऐनवेळीची धावपळ टाळावी जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाहीत व रुग्णांचे बळी टाळता येतील, असे निवेदनात म्हटले आहे.