जळगाव : संभाव्य रुग्णांचा शोध, त्यांची तातडीने तपासणी व उपचार (ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट) ही त्रिसुत्री तसेच उपचाराचे केलेले विकेंद्रीकरण यामुळे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली. या सोबतच कोरोनाच्या उपाययोजनांसह विकासावर लक्ष केंद्रीत करणे तसेच जनतेची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी देखील उपाययोजना करणे, अशा आघाड्यांवर काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी राऊत यांनी गुरुवारी छत्रपत्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील लोकमत शहर कार्यालयाला भेट दिली. निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी राऊत यांचे स्वागत केले.प्रशासन रुग्णांच्या दारीसुरुवातीला रुग्ण दवाखान्यात यायचे, आता रुग्णालय व प्रशासन रुग्णाच्या दाराशी जात आहे. किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांची अॅँटीजन चाचणी केली जात आहे. त्यामुळे रुग्ण निष्पन्न होण्याचा आकडा जसा वाढतो आहे, तसे त्यांच्यावर उपचार तातडीने होत असल्याने संभाव्य धोके कमी होत आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकला. ७० टक्के बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तपासण्या वाढवून रुग्ण निष्पन्न करणे हा हेतू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सुरुवातीच्या काळात नकारात्मक वातावरणसुरुवातीला अधिक मृत्यूंमुळे डॉक्टर, इतर कर्मचाऱ्यांसह नागरिक व रुग्णांमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले होते. रुग्णसेवेत झोकून देणाºया यंत्रणेचे मनोबल वाढवून उपचाराचे विकेंद्रीकरण केले. ग्रामीण भागातील रुग्णांना त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर उभारण्यात आले, त्याशिवाय खासगी रुग्णालयांना देखील परवानगी देण्यात आली. त्यामुळे जळगावात बाहेरुन येणाºया रुग्णांना तालुका पातळीवरच रोखल्याने तातडीने उपचार झाले. नकारात्मक दृष्टीकोन बदलला, असे जिल्हाधिकारी म्हणाले.आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सिरो सर्वेक्षणसिरो सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अॅन्टीबॉडीज चाचणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली़ आधीच्या सर्वेक्षणात राज्यात सर्वात कमी संसर्ग जिल्ह्यात असल्याचे समोर आले होते़ त्याला तीन महिने उलटले असून आता नेमक्या किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे़, हे या माध्यमातून तपासता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले़...तर परिस्थिती चिंताजनक होतेकिरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णाची पहिल्या तीन दिवसात तपासणी झाली नाही तर पाचव्या दिवशी श्वास घ्यायला अडचण निर्माण होऊन छातीत वेदना होतात. नंतरच्या ५ ते ७ दिवसात त्या रुग्णाला आॅक्सिजनची गरज भासू शकते, त्यातही मधुमेह व इतर आजार असले तर धोका बळावतो. हेच धोके लक्षात घेता किरकोळ लक्षणे असणाºयांच्या तपासण्या वाढविण्यासह खासगी रुग्णालयांनाही ताप व छातीचा एक्सरे काढायला आलेल्या रुग्णांची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‘लोकमत’मुळे नववीपासून मिळाले प्रोत्साहनमी नववीत असताना ‘लोकमत’ने एका राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते़ त्यात मी राज्यातून प्रथम आलो होतो़ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते़ त्यावेळी झालेला सत्कार व त्यानंतर आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला व या स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळाले़, अशी आठवणही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितली.
शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीमुळे कोरोनावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:05 PM