जळगाव : महानगरपालिकेला शासनाकडून मिळालेल्या ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून आमदार सुरेश भोळे यांनी भाजपा नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये हा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निधीतून केवळ भाजपाच्याच नगरसेवकांच्या प्रभागात हा निधी वितरीत केल्याचा मुद्यावरून सोमवारी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांच्या दालनात जावून आमदार भोळे यांना जाब विचारला. यामुळे आमदार भोळे व नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यात चांगलाच वाद झाला.मनपाला विशेष निधी म्हणून ५ कोटीचा निधी मंजूर झाला होता. आमदार सुरेश भोळे यांनी ५ कोटीच्या निधीमधून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी साडे सात लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निधीचे वितरण करताना आमदार भोळे यांनी शिवसेना नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक ५ व १५ मध्ये हा निधी वितरीत केलेला नाही. त्यामुळे केवळ भाजपा नगरसेवकांच्याच प्रभागांमध्ये हा निधी दिल्यामुळे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रशांत नाईक हे महापौरांच्या दालनात गेले. त्यांनी आमदार भोळे यांना शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात निधीचे नियोजन का केले नाही ? असा प्रश्न विचारला. त्यावर आपण राजकारण करू नये असे उत्तर आमदार भोळे यांनी दिले. यावेळी भाजपाचे मनपा गटनेते भगत बालानी हे देखील उपस्थित होते.हाच का तुमचा समान विकास- प्रशांत नाईकआमदार भोळे यांनी मनपावर भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्व शहराचा समान विकास करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विरोधी पक्ष व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये भेद केला जाणार नाही असे देखील सांगितले होते. मात्र, आमदारांनी हे केवळ दिखाव्यासाठीच सांगितले असल्याचा आरोप प्रशांत नाईक यांनी केला. तसेच आमदार सुरेश भोळे हे संपूर्ण शहराचे आमदार आहेत. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील नागरिक हे त्यांचे देखील मतदार आहेत. मात्र, आमदार हे भेदाचे राजकारण करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.विकासाचा अनुशेषभरण्याचा प्रयत्नभाजपा नगरसेवकांच्या प्रभागात गेल्या काही वर्षांपासून विकास झाला नव्हता. त्यामुळे विकासाचा अनुशेष भरण्यासाठी या निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्रशांत नाईक यांचे आरोप केवळ राजकारणासाठी केले जात आहे.-सुरेश भोळे, आमदार
जळगावात निधीच्या असमान वितरणावरून नगरसेवक व आमदारांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:04 PM