भुसावळ : न्यायालयीन तारखेसाठी खुनातील संशयित आरोपींना पोलीस बंदोबस्तात आणत असताना झालेल्या गोळीबारात नट्ट चावरिया हा ठार झाला. याप्रकरणी धुळ्यातील चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी येथे दिली़ धुळ्यातील एएसआय अंकुश शिरसाठ, जयकुमार चौधरी, सुमित ठाकूर, संजय चव्हाण अशी या पोलिसांची नावे आहेत. हे चारही जण आरोपींच्या बंदोबस्तात होते. नट्टू चावरिया व त्याचा साथीदार गोपाळ शिंदे यास धुळे कारागृहातून भुसावळ येथे आणले जात होते. त्यावेळी भुसावळच्या नाहाटा चौफुलीवर बसमध्ये आधीपासून बसलेला अमित परीहार याने गोळीबार केल्याने चावरीया हा ठार झाला होता. चौबे यांनी भुसावळला गुरुवारी दुपारी भेट दिली़ गोळीबार झालेल्या घटनास्थळासह ज्या बसमध्ये गोळीबार झाला त्या बसचीही चौबे यांनी पाहणी केली़आरोपीने ज्या बसमध्ये गोळीबार केला. त्या बसची अधीक्षक कार्यालय आवारात महानिरीक्षकांनी पाहणी केली़ 16 तारखेर्पयत आरोपी सागर मदन बारसे (रा़डोंगरसांगवी, ता़यावल) व अमित नारायणसिंग परिहार (नागसेन कॉलनी, कंडारी, ता़भुसावळ) यांना भुसावळ सत्र न्यायालयात न्या़एम़एम़भवरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ 03 जण अटकेत आहेत. 9 जणांना आरोपी करण्यात आले आहे. कट रचण्याच्या आरोपाखाली माजी नगरसेवक संतोष बारसे, दीपू बारसे, पापा बारसे, मिथून बारसे, भु:या बारसे, गोजो:या सकरू जाधव, पिद्या (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संतोष, दीपू व पापा बारसे अटकेत आहेत.