लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुक्रवारी पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आला. यात १४ चारचाकी वाहनांचा समावेश होता. दरम्यान, उर्वरित १५ वाहने व ७० दुचाकी दोन ते तीन महिन्यात पोलीस दलात दाखल होतील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. नंतर गुलाबराव पाटील यांनी वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली होती. अखेर २९ पैकी १४ चारचाकी वाहने शुक्रवारी सायंकाळी पोलीस दलात दाखल झाली. यावेळी पालकमंत्री यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राउत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुळकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.
तपासाला मिळणार गती
२९ चारचाकी वाहनांपैकी १४ चारचाकी वाहने ही पोलीस दलात दाखल झाली आहेत. उर्वरित वाहने लवकरचं पोलीस दलास उपलब्ध होतील. दरम्यान, या वाहनांमुळे तपासाला गती तर मिळेलचं पण नागरिकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा सुध्दा पूर्ण होतील. योग्य कामासाठी हा निधी वापर केला गेला आहे, असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले व पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, पोलीस ठाण्यात वाहनाची आवश्यकता आहे, त्याठिकाणी ही वाहने देण्यात येणार आहे.
२ कोटी ३० लाखाची तरतूद
जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारीला २९ चारचाकी आणि ७० दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लक्ष, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील एक कोटी रूपयांची वाहने खरेदी करण्यात आली आहेत.